ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची चाहूल लागताच वसमत विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या संभाव्य उमेदवारांनी निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटण्यासाठी कंबर कसली आहे. युती होईल अथवा नाही मैदानात उतरायचेच असा चंग भाजपचे इच्छुक उमेदवार अॅड. शिवाजीराव जाधव यांनी बांधला आहे. एकीकडे भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे जोरदार तयारीला लागले असताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून होत असलेल्या कार्यकर्त्यांच्या गळतीमुळे शांतता आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीमध्ये ही या मतदारसंघात सामसूम दिसत आहे. कोणताच इच्छुक उमेदवार सध्या डोकं वर काढताना दिसत नाही.
राज्यपातळीवर भाजपासोबत युती करण्यासाठी शिवसेना इच्छुक आणि उत्सुक दिसत असली तरी भाजपमध्ये होत असलेली मोठ्या नेत्यांची मेगाभरती पाहता शिवसेनेसोबत युती करणार नाही, स्वबळावरच निवडणुकीला सामोरे जाणार असा वसमतमधील स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांचा समज आहे.
शिवसेना-भाजपची युती झाल्यास वसमत विधानसभा मतदारसंघांमध्ये वसमतची जागा शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहे. इथून शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांनाच उमेदवारी मिळू शकते हे सर्व माहीत असतानाही भाजपच्या इच्छुकांनी स्वबळाची तयारी सुरु केलीय.
भाजपचे अॅड. शिवाजीराव जाधव यांनी अनेक दिवसापासून गावोगावी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान प्रचंड गर्दी जमवून अॅड. शिवाजीराव जाधव यांनी शक्तीप्रदर्शनही केलं. शिवाजी जाधव यांचे झंझावती प्रचार दोरे, मुख्यमंत्र्याची सभा हे पाहता शिवसेना-भाजप युती विषयी संभ्रमाचे वातावरण दिसत आहे. भाजपने प्रत्येक मतदारसंघात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणे सुरू केल्याने, स्वबळाच्या चर्चेला चांगलंच बळ मिळालं आहे.
तर शिवसेना देखील या मतदारसंघात कुठेच कमी नाही. वसमत विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. राज्याचे माजी सहकारमंत्री जयप्रकाश मुंदडा हे मतदारसंघाचे शिवसेनेकडून विद्यमान आमदार आहेत. 2014 च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशी चौरंगी लढत झाली होती. यात शिवसेनेचे जयप्रकाश मुंदडा यांचा विजय झाला होता.
2014 विधानसभा वसमत निवडणूक निकाल
विजयी उमेदवार जयप्रकाश मुंदडा मिळालेली मते- 63851
राष्ट्रवादीचे जयप्रकाश दांडेगावकर - 58295
भाजपचे शिवाजीराव जाधव - 51197
काँग्रेसचे अब्दुल हाफिज अब्दुल रहमान - 13996
2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठी वसमत मतदारसंघात राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाल्यास राजू नवघरे आणि जयप्रकाश दांडेगावकर इच्छुक आहेत. भाजपकडून शिवाजीराव जाधव, शिवसेनेकडून जयप्रकाश मुंदडा उत्सुक आहेत.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव इच्छुकांच्या चर्चेत सध्यातरी दिसत नाही.
या मतदारसंघात मतदान हे जातीच्या आधारावर होत नसून विकास कामाच्या आधारावर होत असते. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे जयप्रकाश दांडेगावकर आणि काँग्रेसचे जयप्रकाश मुंदडा या दोघांनीच सत्ता भोगली आहे. तर या वेळेस नवीन चेहऱ्याला संधी मिळेल का, हा वसमतकरांसाठी उत्सुकतेचा विषय आहे.