सोलापूर : राज्यातील विधानसभा निवडणुकीत यंदा वेगळीच रंगत आहे, कारण पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होत आहे. त्यात, सोलापूर जिल्ह्यात भाजपला टस्सल देत यंदा शरद पवारांनी स्वत: लक्ष घातलं आहे. कारण, लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या रणनीतीमुळे जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहे. त्यामुळे, विधानसभा निवडणुकीतही तशीच रंगत असणार आहे. जिल्ह्यातील बार्शी मतदारसंघ यंदा मनोज जरांगे व आमदार राजेंद्र राऊत यांच्यामुळे राज्यात लक्षवेधी आहे. त्यातच, येथील मतदारसंघात माजी मंत्री दिलीप सोपल (Dilip Sopal) व आमदार राजेंद्र राऊत यांच्यातच खरी लढत होत आहे. त्यामुळे,  मनोज जरांगेंचा (Manoj Jarange) उेमदवार कोण असणार, तो असणार की नाही यावरही येथील लढतीचे गणित अवलंबून आहे. 


बार्शी विधानसभा मतदारसंघात दिलीप सोपल यंदा शिवसेना युबीटी म्हणजेच ठाकरेंच्या मशालीकडून निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर, आमदार राजेंद्र राऊत हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे येथील मतदारसंघात काँटे की लढत होणार आहे. आमदार राऊत यांनी गत 5 वर्षांच्या काळात केलेल्या विकासकामांच्या आणि खेचून आणलेल्या निधीच्या जोरावर ते जतनेकडे जात आहेत. तर, तालुक्यातील जनतेला मोकळा श्वास घेता यावा म्हणून आपण मैदानात आहेत, असे म्हणत दिलीप सोपल यांनी राऊतांवर अप्रत्यक्षपणे टीका केलीय. मतदारसंघात गेल्या 25 वर्षांपासून थेट सोपल विरुद्ध राऊत असाच सामना होत आहे. बार्शीत राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे नेते आणि माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांची यंदा दिलीस सोपल यांना साथ आहे. मात्र, गत 2019 च्या निवडणुकीत त्यांनी आमदार राऊत यांच्यासाठी काम केलं होतं. त्यामुळे, त्यांचा इम्पॅक्ट मतदारसंघात होईल का हेही पाहावे लागेल. तसेच, यंदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापलं असताना, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगेंसोबत थेट पंगा घेतल्याने या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच, येथील मतदारसंघात मनोज जरांगे फॅक्टरचा परिणाम होईल का, त्याचा फटका कोणाला बसेल हे निकालाच्या दिवशीच समजणार आहे. 


2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय?


गत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बार्शी मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली. शिवसेना युतीकडून माजी मंत्री दिलीप सोपल यांना तिकीट मिळालं होतं. सोपल यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवारांची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. तर, भाजपकडून इच्छुक असलेल्या राजेंद्र राऊत यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यामुळे, येथील मतदारसंघात आघाडीकडून निरंजन भूमकर यांना तिकीट देण्यात आलं होतं. भूमकर यांना बार्शी तालुक्यातील वैराग भागात जनाधार आहे. त्यामुळे, भूमकर यांना तिकीट देऊन शरद पवार व अजित पवार यांनी त्यांच्यासाठी सभाही घेतल्या होत्या. दरम्यान, येथील निवडणुकीत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत हे 3076 मतांनी विजयी झाले. तर, भूमकर यांच्या उमेदवारीचा फटका सोपल यांना बसला होता. यंदाही सोपल विरुद्ध राऊत यांच्यात तगडी फाईट असल्याचे दिसून येते. 


लोकसभेला ओमराजेंना मोठं मताधिक्य


लोकसभा निवडणुकीत बार्शी मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना मोठं मताधिक्य मिळालं आहे. ओमराजे निंबाळकर यांनी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा 3 लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला. त्यात, बार्शी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना महाविकास आघाडीच्या ओमराजे निंबाळकर यांना तब्बल 55 हजारांचं मताधिक्य आहे. बार्शी मतदारसंघात त्यांच्यासाठी दिलीप सोपल यांच्या नेतृत्वात प्रचाराची धुरा सांभाळण्यात आली होती. त्यामुळे, विधानसभा निवडणुकांसाठी दिलीप सोपल यांचं पारडं मतदारसंघात वरचढ मानलं जात आहे. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचं गणित वेगळं असतं, असाही राजकीय अंदाज काहीजण व्यक्त करतात. 


बार्शी मतदारसंघात 3 लाख 32 हजार मतदान


सोलापूर जिल्ह्यातील 246 बार्शी विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख, 32 हजार, 28 मतदार नोंदले गेले आहेत. त्यापैकी 1 लाख 70 हजार 930 पुरुष आणि 1 लाख, 61 हजार, 55 महिला मतदारांचा समावेश आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदारसंख्येत यंदा 2.58 टक्के वाढ झाली आहे.


हेही वाचा


राज्यातील 288 मतदारसंघातील सर्वपक्षीय उमेदवारांची यादी