बारामती : पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीत लोकसभा निवडणूक आणखी रंगतदार होणार आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात भाजपच्या तिकीटावर राष्ट्रीय समाज पक्षाच्या आमदाराची पत्नी रिंगणात उतरणार आहे.

रासप आमदार राहुल कुल यांची पत्नी कांचन कुल बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. मात्र भाजपच्या तिकीटावर म्हणजेच कमळ चिन्हावर कांचन कुल रिंगणात उतरतील.

राहुल कुल हे पुणे जिल्ह्यातील दौंडचे आमदार आहेत. राहुल कुल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय निकटचे सहकारी मानले जातात. आमदार राहुल कुल यांच्या विधानसभेच्या प्रचारात कांचन कुल दौंडमध्ये सक्रिय होत्या. आताही वेगवेगळ्या कार्यक्रमात त्यांचा काही प्रमाणात सहभाग दिसून येतो.

कांचन कुल यांचे माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील असून त्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या जवळच्या नातेवाईक आहेत.