इस्लामाबाद : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला राष्ट्रीय पाकिस्तान दिनाच्या (नॅशनल पाकिस्तान डे)शुभेच्छा दिल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. इम्रान खान यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान असेदेखील बोलले जात आहे की, भारताच्या पंतप्रधानांनी इतर देशांच्या राष्ट्रीय दिवसनिमित्त किंवा राष्ट्रीय सणानिमित्त शुभेच्छा देणे हा औपचारिकतेचा भाग आहे. दरम्यान भाजपनेदेखील ही केवळ औपचारिकता असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे पाकिस्तान नॅशनल डेनिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांवर भारताने बहिष्कार घातला आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला 'नॅशनल पाकिस्तान डे'च्या शुभेच्छा दिल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे.

इम्रान खान यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये सांगितले आहे की, नरेंद्र मोदी शुभेच्छा संदेशात म्हणतात, मी नरेंद्र मोदी 'पाकिस्तान नॅशनल डे'निमित्त पाकिस्तानी जनतेला शुभेच्छा देतो. उपखंडातील जनतेने दहशतवाद आणि हिंसाचारमुक्त वातावरणात लोकशाही, शांतता आणि प्रगतीशील क्षेत्राच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करण्याची ही योग्य वेळ आहे."


दुसऱ्या एका ट्वीटमध्ये इम्नान खान यांनी नरेंद्र मोदींच्या शुभेच्छांचा स्वीकार केला आहे. दोन्ही देशांमधील प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा करण्याची वेळ आली असल्याचे मत इम्रान यांनी मांडले आहे.


दरम्यान यावरुन काँग्रेसने मोदींवर टीका करणे सुरु केले आहे. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी ट्विटरद्वारे त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. खुर्शीद यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "हम उफ़्फ़ भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम, वो क़त्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होता"