Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 : मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही, देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज अखेर घोषणा करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाची दिल्लीतील विज्ञान भवनात पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगानं महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यात. 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तर, 23 नोव्हेंबरला मतमोजणी असणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत बंडाळीनंतरची पहिली निवडणूक असल्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची ठरणार यात काही शंका नाही.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे 10 मुद्दे
- महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे.
- नांदेड लोकसभा पोट निवडणुकीचीही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाणांच्या मृत्युनंतर जागा रिक्त होती. महाराष्ट्राच्या विधानसभेसोबतच मतदान होणार आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार
- केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करताच राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली. चौदावी विधानसभा 26 नोव्हेंबरला संपुष्टात येणार आहे. त्यामुळे 26 नोव्हेंबरआधी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करणं आयोगासाठी बंधनकारक आहे. त्यामुळे त्यापूर्वीच निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं.
- निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण 288 विधानसभा मतदारसंघांत निवडणूक होत आहे. त्यासाठी, राज्यात पुरुष मतदार 4. 95 कोटी आणि स्त्री मतदार 4.66 कोटी आहेत, थर्ड जेंडर म्हणजेच तृतीयपंथी मतदारांची संख्या 5997 असून राज्यातील दिव्यांग मतदार 6.32 लाख एवढे आहेत. यंदा पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवयुवकांची संख्या म्हणजे नव मतदार 19.48 लाख एवढे आहेत. राज्यांत महिला मतदारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून 10.77 लाख मतदार आहेत.
- मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिलेल्या माहितीनुसार, एकूण 52789 ठिकाणी 100186 मतदान केंद्र असणार आहेत. त्यापैकी शहरी भागांत 42604, तर ग्रामीण 57582 मतदान केंद्र असणार आहेत. एका मतदान केंद्रावर सरासरी 960 मतदार मतदान करतील.
- निवडणूक आयोगाच्यावतीनं सुविधा पोर्टल नावानं अॅप जारी करण्यात आलं आहे. या एप्लिकेशन्सवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणी काही घटना घडली किंवा उशीरापर्यंत मतदान सुरू असेल तर केवळ फोटो काढून या एप्लिकेशन्सवर अपलोड केला की, 90 मिनिटांत निवडणूक आयोगाची टीम तिथं पोहचेल, असं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय. राज्यात पहिल्यांदाच सहा मोठे पक्ष निवडणुकीला सामोरं जाणार आहेत, यात प्रामुख्यानं महायुती आणि महाविकास आघाडीत रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.