मुंबई : पाच राज्यांचे कल समोर आल्यानंतर मध्य प्रदेश वगळता सत्ता स्थापनेचं चित्र जवळपास स्पष्ट होतांना दिसत आहे. भाजपच्या हातून राजस्थान आणि छत्तीसगड खेचून आणण्यात काँग्रेसला यश आलं आहे, तर मध्य प्रदेशात मात्र भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर आहे.


तेलंगणात मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना आपला गड राखण्यात यश आलं आहे, तर मिझोरम मात्र काँग्रेसच्या हातून निसटलं. मिझोरम नॅशनल फ्रन्ट मिझोरममध्ये सत्ता स्थापन करत आहे.


निवडणुकीच्या निकालनंतर आता मुख्यमंत्री कोण होणार या चर्चा रंगू लागल्या आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असली तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचं नाव त्याठिकाणी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे.


राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांची सत्ता उलथून लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या काँग्रेसचे अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांनी नावं मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहेत. राजकारणाचा दिर्घ अनुभव असलेले अशोक गहलोत की युवा नेतृत्व सचिन पायलट यांच्या खांद्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी येणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल.


छत्तीसगड मध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेश बघेल आणि काँग्रेसचे नेते टी एस सिंहदेव यांची नावं मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. तर तेलंगणात विद्यमान मुख्यमंत्री के चंद्रशेखर हे मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार आहे.