मुंबई : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भाजपची पिछेहाट झाली आहे. भाजपच्या या अपयशावर महाराष्ट्रातील मित्रपक्ष शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही टीकात्मक प्रतिक्रिया दिली आहे.


“पर्याय कोण? या फालतू प्रश्नात गुंतून न पडता चार राज्यांतील मतदारांनी धाडस दाखवले आहे. त्यांच्या बेडरपणाचं मी अभिनंदन करतो. अशा प्रखर शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.


उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, "निवडणुकीत हार जीत तर होतेच. जिंकतो त्याचे अभिनंदन तर होतच असते. मात्र चार राज्यांत परिवर्तन घडवणाऱ्या मतदारांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी ईव्हीएम, पैसावाटप, गुंडागर्दी आणि त्याही पेक्षा 'पर्याय कोण' या फालतू प्रश्नात गुंतून न पडता जे नकोत त्यांना आधी नाकारले आहे. पुढे काय ते बघू, हेच खरे धाडस आहे. मतदारांनी दाखवलेल्या धाडसाने देशाला नवी दिशा दिली आहे. सर्व मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो"


भाजपच्या हातून राजस्थान आणि छत्तीसगड खेचून आणण्यात काँग्रेसला यश आलं आहे, तर मध्य प्रदेशात मात्र भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर आहे. तेलंगणात मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना आपला गड राखण्यात यश आलं आहे, तर मिझोरम मात्र काँग्रेसच्या हातून निसटलं. मिझोरम नॅशनल फ्रन्ट मिझोरममध्ये सत्तास्थापन करत आहे.


लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्याच्या वर्षपूर्तीलाच त्यांना मोठं गिफ्ट मिळालं आहे.


राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना काँग्रेसने मोठा हादरा दिला. सतत पाच वर्षांनी सत्तापालटाचा राजस्थानचा ट्रेण्ड कायम राहिला आहे. राजस्थानमध्ये भाजपने कडवी झुंज दिली असली, तरी काँग्रेसला बहुमत मिळालं आहे.


छत्तीसगडमध्ये रमण सिंह यांचं सरकार काँग्रेसने केवळ खालसाच केलं नाही, तर भाजपचा सुपडासाफ झाला. मध्य प्रदेशात मात्र भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये कांटे की टक्कर रंगली.


तेलंगणामध्ये टीएसआरच्या के चंद्रशेखर राव यांना आपला गड राखण्यात यश आलं आहे. मिझोरममध्ये सत्तापालट झाले असून तीन मोठ्या राज्यात मोठी आघाडी मिळवणाऱ्या काँग्रेसने आपल्या हातून मिझोरमची सत्ता गमावली आहे. मिझोरम नॅशनल फ्रन्टने मिझोरममध्ये सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत.


संबंधित बातम्या

Election Results Live Updates: राजस्थान CM पदासाठी गहलोत चर्चेत

भाजप खासदार संजय काकडे यांचा पक्षाला घरचा आहेर

गेल्या वेळी केवळ एका मताने पराभव, यावेळी...