मुंबई : नांदेड जिल्ह्यातील भोकरमध्ये एका दिवसात तब्बल 84 अर्ज मागे घेण्याचा विक्रम आज झाला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उमेदवार असलेल्या भोकर मतदारसंघात तब्बल 134 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा संख्येत भोकर राज्यात अव्वल ठरले होते. 134 पैकी 91 अर्ज पात्रही ठरले होते. तब्बल 91 उमेदवार असल्याने प्रशासन आणि अशोक चव्हाण यांना डोकेदुखी ठरणार होती. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 84 उमेदवारांनी माघार घेतली. आता भोकरमध्ये केवळ 7 उमेदवार रिंगनात आहेत.
आज शेवटच्या दिवशी राज्यभरात आज 288 मतदारसंघातून एकूण 1504 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे 4739 वैध उमेदवारांपैकी आता 3239 उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
नांदेड दक्षिणमध्ये सर्वाधिक उमेदवार तर सर्वात कमी चिपळूणमध्ये
सर्वात कमी 3 उमेदवार रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मतदारसंघात तर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 38 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नांदेड दक्षिण, बीड, औरंगाबाद पूर्व, जालना या चार मतदारसंघात 31 पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असल्याने एका ईव्हीएमसाठी 3 बॅलेट युनिटची आवश्यकता राहणार असून कंट्रोल युनिट एकच लागणार आहे.
आचारसंहिता लागल्यापासून 48.2 कोटींचा मुद्देमाल जप्त
आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात 11 कोटी 39 लाख रुपयांची रोकड, 12 कोटी 47 लाख रुपयांची दारु, 15 कोटी 29 लाख रुपये किमतीचे मादक पदार्थ आणि 8 कोटी 87 लाख रुपये किमतीचे सोने, चांदी व अन्य मौलवान दागिणे असा सुमारे 48 कोटी 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.