Assembly Elections 2023 Survey: वर्षाखेरीस देशातील 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका (Assembly Elections 2023) पार पडणार आहेत. या 5 राज्यांपैकी मध्यप्रदेश (Madhya Pradesh), छत्तीसगड (Chhattisgarh) आणि राजस्थानवर (Rajasthan) भाजप (BJP) आणि काँग्रेसचं (Congress) विशेष लक्ष असणार आहे. कारण, मध्यप्रदेशात भाजपचं आणि  छत्तीसगढ, राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. दोन्ही पक्षांनी आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. तसेच, ज्या राज्यात आपली सत्ता आहे, त्या राज्यात आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी, तर ज्या राज्यांमध्ये आपली सत्ता नाही, त्या राज्यांमध्ये आपली सत्ता आणण्यासाठी दोन्ही पक्ष कसोशीनं प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. 


मध्य प्रदेशात सध्या भाजपची सत्ता आहे. त्यामुळे मध्यप्रदेश भाजपकडून हिरावण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसली आहे. काँग्रेसला 2020 चा बदला घेऊन मध्यप्रदेशात आपला झेंडा फडकवायचा आहे. त्याचं झालं असं की, 2018 मध्ये मध्यप्रदेशात काँग्रेसनं बसपा, सामजवाही पार्टी आणि अपक्षांच्या मदतीनं सरकार स्थापन केलं होतं. पण, 2020 मध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांची बंडखोरी आणि त्यानंतर त्यांनी केलेला भाजप प्रवेशाचा निर्णय, यामुळे काँग्रेसची सत्ता भाजपनं हिरावून घेतली होती. त्याचाच वचवा काढण्याचा प्रयत्न काँग्रेस या निवडणुकीत करणार आहे. 


यावेळी या तिन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काय घडेल? मतदानानंतरच्या निकालांमधूनच हे स्पष्ट होईलच. परंतु, India TV-ETG Opinion Poll आणि IANS-पॉलस्ट्रॅटच्या नव्या सर्वेक्षणातून आगामी निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार? आणि कोणाचा दारुण पराभव होणार, याबाबत अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


कॉंग्रेस की भाजप, मध्य प्रदेशात कोणाचं सरकार? 


मध्य प्रदेशात 230 विधानसेभेच्या जागा आहेत, तर बहुमताचा आकडा 116 आहे. म्हणजेच, सरकार स्थापन करण्यासाठी मध्यप्रदेशात कोणत्याही पक्षाला 116 जागांवर विजय मिळवण्याची गरज आहे. ईटीजी ओपिनियन पोलनुसार, मध्य प्रदेशात कॉंग्रेसला बहुमत मिळाल्याचं निष्कर्षातून समोर आलं आहे.  
सर्वेक्षणाच्या निष्कर्षामधून 230 विधानसभेच्या जागांपैकी काँग्रेसला 118 ते 128 जागा आणि भाजपला 102 ते 110 जागांवर विजय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, 2 जागा इतर पक्षांना मिळण्याची शक्यता आहे. 


मध्य प्रदेशातील कोणत्या भागात किती जागा आहेत?


सर्वेक्षणानुसार, मध्य प्रदेशातील महाकौशल भागातील 38 जागांपैकी, भाजपला 18-22 जागा मिळू शकतात आणि कॉंग्रेसला 16-20 जागा मिळू शकतात. ग्वाल्हेर-चंबळ भागातील 34 जागांपैकी कॉंग्रेसला 26-30 जागा आणि भाजप 4-8 जागा मिळण्याची शक्यता आहे.


मध्य मध्य प्रदेशातील 36 जागांपैकी भाजपला 22-२4 जागा आणि कॉंग्रेसला 12-14 जागा मिळतील असा अंदाज आहे. बुंदेलखंड प्रदेशातील 26 जागांपैकी भाजपला 13 ते 15 जागा आणि कॉंग्रेसला 11-13 जागा मिळण्याची शक्यता आहे.


विंध्य प्रदेशातील 30 जागांपैकी भाजपाला 19-21 जागा आणि कॉंग्रेसला 8-10 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच, मालवा प्रदेशातील 66 जागांपैकी कॉंग्रेसला 41 ते 45 जागा आणि भाजपला 20-24 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. 


छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्ता राखणार की, भाजप जिंकणार? 


छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या 90 जागा आहेत. राज्यातील बहुमताचा आकडा 46 जागांचा आहे. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर IANS-पोलस्ट्रॅटनं आपल्या ताज्या सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर केली असून, काँग्रेस पूर्ण बहुमतानं सरकार स्थापन करत असल्याचं सर्वेक्षणाच्या निष्कर्षांमधून समोर आलं आहे. सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार, विधानसभेच्या 90 जागांपैकी काँग्रेसला 62 आणि भाजपला 27 जागा मिळू शकतात. 


राजस्थानमध्ये काँग्रेस की भाजप, कोण जिंकणार?


राजस्थानमध्ये विधानसभेच्या 200 जागा आहेत आणि राज्यातील बहुमताचा आकडा 101 जागा आहे. म्हणजेच, 101 जागा जिंकणारा पक्ष सरकार स्थापन करेल, परंतु ताज्या ओपिनियन पोलमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राजस्थान विधानसभा निवडणुका पाहता, ETG च्या जनमत चाचणीच्या आकडेवारीनुसार, 200 जागांपैकी भाजपला 95 ते 105 जागा आणि काँग्रेसला 91 ते 101 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर इतरांच्या खात्यात 3-6 जागा जाण्याची शक्यता आहे.


एकीकडे काँग्रेस पक्षश्रेष्टी निवडणूक राज्यांमधील प्रचारात सहभागी होत आहे, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाजपच्या बाजूनं पुढाकार घेतला आहे. शनिवारी पंतप्रधान मोदींनी छत्तीसगडमधील बिलासपूर येथे एका सभेला संबोधित केलं. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 आणि 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी मध्य प्रदेशला भेट देतील आणि निवडणूक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप हायकमांडपर्यंत कसा पोहोचणार 543 जागांचा ग्राउंड रिपोर्ट? पक्षाचा मास्टरप्लान