मुंबई: महाराष्ट्रातील दोन विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. कसबापेठ आणि चिंचवड 27 फेब्रुवारीला पोटनिवडणूकीसाठी मतदान होणार असल्याचं निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे. ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारी तर मेघालय आणि नागालॅंडमध्ये 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 2 मार्च रोजी जाहीर करण्यात येणार आहे. 


पुण्यातील कसबा पेठच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर या जागा रिक्त होत्या. आता या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. 


टिळकांची पणतसून म्हणून 1992 मध्ये मुक्ता टिळक यांनी राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर त्या 17 वर्ष नगरसेवक होत्या. अडीच वर्ष त्या पुण्याच्या महापौर होत्या. त्यानंतर 2019 मध्ये कसबा मतदारसंघातून त्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. 22 डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले.


पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचं 3 जानेवारी रोजी निधन झालं. लक्ष्मण जगताप हे दीर्घ काळापासून आजारी होते. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लक्ष्मण जगताप यांना कर्करोगाने ग्रासलं होतं. त्यांच्यावर नियमित उपचार सुरु होते. मात्र त्यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. लक्ष्मण जगताप हे तीन टर्म पिंपरी-चिंचवडचे आमदार होते.  


ईशान्येतील नागालँडमध्ये भाजपची राजकीय स्थिती फारशी खास नाही. येथे भाजपकडे 15.3 टक्के मतांसह 60 पैकी केवळ 12 जागा आहेत. मात्र, त्रिपुरामध्ये भाजपची स्थिती खूपच चांगली आहे. येथे लोकसभेच्या दोन जागा असून भाजपकडे दोन्ही आहेत. त्याचबरोबर विधानसभेतही भाजपचं बहुमत आहे. 60 पैकी 36 जागा भाजपच्या ताब्यात आहेत.


तीन राज्यांमध्ये मुख्यमंत्री कोण? 



  • नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव पार्टीचे नेता नेफियू रियो नागालँडचे मुख्यमंत्री आहेत.

  • भाजप नेते माणिक साहा त्रिपुराचे मुख्यमंत्री आहेत. 

  • एनपीपीचे कॉनराड संगमा मेघायलचे मुख्यमंत्री आहेत. 


या वर्षी कोणत्या राज्यांमध्ये निवडणुका? 



  • छत्तीसगड (Chhattisgarh)

  • कर्नाटक (Karnataka)

  • मेघालय (Meghalaya)

  • नागालँड (Nagaland)

  • त्रिपुरा (Tripura)

  • मध्यप्रदेश (Madhya Pradesh)

  • मिझोरम (Mizoram)

  • राजस्थान (Rajasthan)

  • तेलंगाणा (Telangana)