मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काल शिवसेना-भाजप युतीचा घोषणा झाली. मात्र युतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आला नव्हता. त्यानंतर आज भाजपने आपल्या 125 उमेदवारांची आणि शिवसेनेनं 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यासोबतच युतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युलाही समोर आला आहे.
युतीच्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेना विधानसभेच्या 124 जागा लढणार आहे. याशिवाय शिवसेनेला विधानपरिषदेच्या भाजपच्या कोट्यातील दोन अधिकच्या जागा दिल्या जातील. तर भाजप आणि मित्रपक्ष 164 जागांवर लढणार आहे. भाजप आपल्या कोट्यातून मित्रपक्षांना 18 जागा सोडण्याची शक्यता आहे.
- BJP Candidate List | भाजपची पहिली यादी जाहीर; खडसे, तावडेंचं नाव नाही
- Shivsena Candidate List | शिवसेनेच्या पहिल्या यादीत 70 उमेदवारांचा समावेश
युतीमध्ये काही जागांवरुन पेच कायम असल्यानं जागावाटप जाहीर केलं नसल्याची चर्चा सकाळपर्यंत होती. भाजपच्या पहिल्या यादीनंतर त्यातील काही जागांवरील चित्र स्पष्ट झालं आहे.
ठाणे शहरमधून पुन्हा संजय केळकर
ठाणे शहर मतदारसंघातून 2014 ला भाजपचे संजय केळकर निवडून आले होते. मात्र युतीत ही जागा शिवसेनेची होती. त्यामुळे शिवसैनिक या जागेसाठी आग्रही होते. मात्र शिवसेनेने ही जागा भाजपसाठी सोडली असून संजय केळकर यांना पुन्हा येथून संधी मिळाली आहे.
वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळंबकर लढणार
वडाळा मतदारसंघातून कालिदास कोळंबकर यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. मुंबई महापालिकेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव याठिकाणी इच्छुक असल्यांने त्यांनी बंडाचं निशाण फडकवलं होतं. आता शिवसेना पक्षश्रेष्ठी श्रद्धा जाधव यांची कशी समजूत काढणार? किंवा त्या अपक्ष निवडणूक लढवणार का? हे पाहावं लागणार आहे.
मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवारांना उमेदवारी
शिवसेनेकडे असलेल्या औसा मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपला ही जागा सोडू नये अशी शिवसैनिकांची भावना होती. मात्र शिवसेनेनं ही जागा अखेर भाजपसाठी सोडली आहे.
गणेश नाईकांना डावलून मंदा म्हात्रेंना पुन्हा संधी
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले नाईक पिता-पुत्र ऐरोली आणि बेलापूरमधून इच्छुक होते. मात्र भाजपने केवळ संदीप नाईक यांना ऐरोलीतून उमेदवारी जाहीर केली. तर गणेश नाईक यांना डावलून बेलापूरमधील विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना पुन्हा संधी दिली आहे.
संबंधित बातम्या
- Shivsena Candidate List | शिवसेनेच्या पहिल्या यादीत 70 उमेदवारांचा समावेश
- उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलेल्या उमेदवाराला 5 हजारांचा दंड, अहमदनगरच्या नेवासामधील घटना