कल्याण : भाजपने ऐरोली मतदारसंघाच्या मोबदल्यात कल्याण पश्चिम मतदारसंघ शिवसेनेला सोडला आहे. त्यामुळे इथले विद्यमान भाजप आमदार नरेंद्र पवार यांचा पत्ता कट झाला आहे. या जागेसाठी आता मूळचे भिवंडीचे असलेले शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांचं नाव चर्चेत आहे. परंतु यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या संदीप नाईक यांच्यासाठी शिवसेनेने ऐरोलीची जागा भाजपला दिली होती. त्याबदल्यात युतीधर्मानुसार शिवसेनेची असलेली कल्याण पश्चिमेची जागा शिवसेनेला मिळाली. यामुळे शिवसैनिकांची मागणी पूर्ण झाली खरी, मात्र आता आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखी शिवसैनिकांची अवस्था झाली आहे. कारण या जागेवर मूळचे भिवंडीचे असलेले शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कल्याणमधले शिवसैनिक, इच्छुक यांच्यात मोठी नाराजी पसरली आहे.

काहीही झालं तरी आमच्यापैकीच एक उमेदवार द्यावा, त्याला आम्ही निवडून आणू, मात्र बाहेरच्या उमेदवाराचा प्रचार आम्ही करणार नाही, अशी थेट भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी याकडे लक्ष देतात का, हे पाहावं लागणार आहे.

ऐरोली, बेलापूर भाजपला सोडल्याने शिवसेनेत नाराजी
नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर दोन्ही मतदारसंघ भाजपाला सोडल्याने शिवसेनेच्या 200 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. शहर प्रमुख, उपजिल्हाप्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख यांचा राजीनाम्यात समावेश आहे. विधानसभेनंतर तीन महिन्यांनी नवी मुंबई महापालिकेची निवडणूक असल्याने पक्षाला मोठे नुकसान होणार असल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

कल्याण पश्चिमवर शिवसेनेचा दावा
कल्याण पश्चिम मतदारसंघात विद्यमान नरेंद्र पवार हे भाजपाचे आमदार आहेत. मात्र कल्याण पश्चिम हा शिवसेनेचा गड आहे. कारण 2015 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक 26 नगरसेवक आणि भाजपचे 6 नगरसेवक या मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेनेने दावा सांगितला आहे.

भाजपचे स्थानिक कार्यकर्तेही नाराज
तर शिवसेनेच्या आग्रहामुळे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांना ही जागा सोडावी लागत असल्याने भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. मंत्री विनोद तावडे या जागेसाठी शेवटपर्यंत प्रयत्नशील होते.