लातूर : इस्रोची सुरुवात आम्ही(काँग्रेस) केली, मात्र आम्ही कधी त्यांच्या कामावर बोललो नाही. आम्हाला सर्वसामान्यांचे प्रश्न मिटवायचे होते. मात्र विद्यमान सरकार कायमच चांद्रयान मोहिमेवर बोलत आहे. सरकारने देशासमोरील प्रश्नांवर काय उपाययोजना केल्या हे सांगता येत नाही हे त्यांचं अपयश आहे. ते झाकण्यासाठीच मग पळवाटा काढत आहेत, अशी टीका काँग्रेस राहुल गांधी यांनी भाजपावर केली आहे. राहुल गांधी आज राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी लातूर जिल्ह्यातील औसा येथे आले होते.
देशात बेरोजगारीची समस्या वाढली आहे का? कर्जमाफी झाली आहे का? आरोग्याचे प्रश्न मिटले आहेत का? शेतकरी आत्महत्या थांबल्या का? शिक्षणाच्या समस्या मिटल्या का? असे अनेक प्रश्न सभेला आलेल्या लोकांना विचारुन राहुल गांधींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. राहुल गांधी यांनी नोटबंदी, जीएसटी, पाकिस्तान-चीन बरोबरचे संबंध, चिनीवस्तू यावरही भाष्य केलं.
आम्ही कायम सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांवर बोलतो आणि त्यावर काम करत आलो. मात्र सरकार हे सर्व सोडून फक्त लोकांचे लक्ष भरकटवतण्याचे काम करत आहे. देशात सध्या दोन हजार पेक्षा जास्त कारखाने बंद पडले आहेत. अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. मोदी सरकारच्या आर्थिक धोरणातील चुकांमुळे देशाची आर्थिक स्थिती खालावली आहे. भविष्यकाळात यापेक्षा वाईट वेळ येणार आहे. बँका बुडत चालल्या आहेत. या सरकारने श्रीमंतांना आपल्या पाठीशी घातलं, तर सर्वसामान्यांना लुटलं आहे. मोठ्या व्यापाऱ्यांची कोट्यवधींची कर्ज माफ केली जात आहेत, मात्र सामान्यांना वेगळा न्याय लावला जात आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला.
देशासमोर सर्व बाजूंनी संकटे असताना हे भाजपचे नेते चांद्रयान, पाकिस्तान यावरच बोलत आहेत. आम्हाला रॉकेट नको भाकर द्या, कारण आज आम्हाला रोजगाराची जास्त गरज आहे. मात्र मोदी, शाह हे लोकांचे कायमच लक्ष भटकवतात, असा टोला राहुल गांधींनी लगावला आहे. या सभेला काँग्रेसचे नेते मलिकार्जुन खरगे, अशोक चव्हाण, शिवराज पाटील चाकूरकर, बाळासाहेब थोरात यांच्यासह लातूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार हजर होते.