ठाणे : लोकसभेच्या निवडणुकांनंतर ज्या आघाडीची सर्वांना शक्यता वाटत होती, ती आघाडी अखेर झाल्याचं समोर येत आहे. ही आघाडी म्हणजे राष्ट्रवादी आणि मनसेची आघाडी. ठाण्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर या आघाडीवर शिक्कामोर्तब झालं आहे.
लोकसभेच्या निवडणुकीवेळी राज ठाकरे यांनी उघडपणे भाजपला विरोध केल्यानंतर अचानक त्यांच्या आणि शरद पवार यांच्यातील जवळीक वाढू लागली होती. त्यानंतर कधी शरद पवारांच्या घरी तर कधी विमानात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली सर्वांनी पाहिली. मात्र या चर्चांचं फलित आता विधानसभेला दिसू लागलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने ठाणे शहर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि मनसेच्या अविनाश जाधव यांना मार्ग मोकळा करून दिला आहे. अशारीतीने राष्ट्रवादीने मनसेच्या अविनाश जाधव यांना पाठिंबा दिला आहे. अविनाश जाधव यांनीही राष्ट्रवादीचे पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले.
केवळ ठाणे शहर हा एकच मतदारसंघ नाही तर कल्याण पश्चिम, नाशिक, मुंबई आणि इतर काही ठिकाणी देखील मनसेच्या उमेदवारांना राष्ट्रवादीने समर्थन दिले आहे. जेणेकरून विरोधातील मतांचे विभाजन होऊ नये.