मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. ईशान्य मुंबईतील राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय दिना पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हातावर शिवबंधन बांधलं. यावेळी बोलताना शिवसेनेसाठी प्रामाणिकपणे काम करत राहिन. तसेच एका नवीन विचारधारेत आपण प्रवेश केला असल्याची प्रतिक्रिया संजय दिना पाटील यांनी व्यक्त केलेली आहे. तसेच मी जरी शिवसेनेत आलो असलो तरीही शरद पवार यांच्यासोबत मी नेहमीच असणार आहे, अशी भावना न पाटील यांनी एबीपी माझा सोबत बोलताना व्यक्त केली.

मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात संजय दिना पाटील यांचा शिवसेनेला फायदा होण्याची शक्यता आहे. कारण लोकसभा निवडणुकीदरम्यान संजय दिना पाटील यांना मानखुर्दमध्ये जास्त मतं मिळाली होती. दरम्यान शिवसेनेकडून विठ्ठल लोकरे यांनी मानखुर्दमधून अर्ज भरला असला तरी रिपाइंकडून गौतम सोनवणे बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे.

संजय दिना पाटील यांनी 2009 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या तिकीटावर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि 15 व्या लोकसभेत विजय मिळवून खासदार बनले होते. परंतु 2014 मध्ये मोदी लाटेमुळे त्यांचा पराभव झाला आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मनोज कोटक यांच्याकडून ते पराभूत झाले होते.



मुंबईतील राष्ट्रवादीची ताकद संपली?

सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर मुंबई शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जवळपास संपल्यात जमा आहे. तर ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील यांनी पक्ष सांभाळला होता. काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील बडे नेते गणेश नाईक यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता केवळ जितेंद्र आव्हाड यांच्या रुपाने मुंबई उपनगरात राष्ट्रवादीचं अस्तित्त्व कायम आहे.