कल्याण : कल्याण पूर्व विधानसभेत शिवसेनेच्या तब्बल 26 नगरसेवकांनी निवडणुकीच्या तोंडावर सामूहिक राजीनामे दिले आहेत. यानंतर त्यांनी भाजपच्या विरोधात मैदानात उतरलेले शिवसेनेचे बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे यांना समर्थन दिलं आहे.


कल्याण पूर्व विधानसभेत शिवसेनेचं प्राबल्य असतानाही विद्यमान अपक्ष आमदार गणपत गायकवाड हे भाजपात गेल्याने हा मतदारसंघ भाजपला देण्यात आला. त्यामुळे शिवसेनेतून इच्छुक असलेले ज्येष्ठ नगरसेवक धनंजय बोडारे यांनी बंडखोरी केली. मात्र यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना युतीधर्म पाळण्याचे आदेश दिला.



मात्र कल्याण पूर्वेतील 26 नगरसेवक आणि सुमारे 300 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. आमच्यामुळे पक्षप्रमुखांना कमीपणा घ्यावा लागू नये, यासाठी हा निर्णय घेत असल्याची प्रतिक्रिया यानंतर शिवसैनिकांनी दिली आहे. तसेच आम्ही पक्षप्रमुखांना कल्याण पूर्वेतून आमदार निवडून आणत भेट देऊ, अशीही भावना शिवसैनिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता कल्याण पूर्वेत शिवसेनेच्या बंडखोरीला चांगलीच धार आल्याचं पाहायला मिळत आहे.