नवी दिल्ली : राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाचा पेच सोडवण्यात अखेर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना यश आलं आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे, तर सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. राहुल गांधी, काँग्रेसचे नेते आणि आमदार यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर गेहलोत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. काँग्रेसने दिल्लीच्या मुख्यालयातून घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.


वसुंधरा राजे यांचं संस्थान खालसा करत काँग्रेसने राजस्थानात सत्ता स्थापन केली. राजस्थान विधानसभेत 99 जागा मिळवत काँग्रेस सर्वात पक्ष ठरला, तर भाजपच्या वाट्याला 73 जागा आल्या. राजस्थानमध्ये काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशाचं श्रेय युवा नेते सचिन पायलट आणि अशोक गेहलोत या दोघांनाही दिलं गेलं. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर दिली जाणार, याचा सस्पेन्स गेले काही दिवस कायम होता.

अशोक गहलोत यांचा परिचय

68 वर्षांचे अशोक गहलोत यांनी यापूर्वी दोन वेळा राजस्थानचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. पहिल्यांदा 1998 ते 2003 आणि दुसऱ्यांदा 2008 ते 2013 या कालावधीत त्यांनी दोन टर्म पूर्ण केल्या आहेत.

राजस्थानातल्या जोधपूरमध्ये त्यांचा जन्म झाला. विज्ञान आणि कायदा अशा दोन्ही विषयांची पदवी घेतल्यानंतर त्यांनी अर्थशास्त्रात एमए केलं. महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित होऊन अगदी तरुण वयातच ते राजकीय क्षेत्रात आले.

गहलोत यांच्यातली क्षमता पहिल्यांदा ओळखली ती इंदिरा गांधी यांनी. 1971 च्या काळात गहलोत बांग्लादेशातल्या रेफ्युजींचा प्रश्न ऐरणीवर असताना तिथल्या रेफ्युजी कॉलनीत काम करण्यासाठी सीमेवर गेले होते. तेव्हाच इंदिरा गांधींनी त्यांच्यातली सचोटी, काम करण्याची तडफ ओळखली. त्यांना तेव्हा काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचं राज्य अध्यक्षपदही देण्यात आलं. त्यानंतर आजतागायत गहलोतांनी पक्षासाठी वेगवेगळ्या पदांवर काम केलं आहे.


राहुल गांधींनी अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर काँग्रेसमध्ये जे राहुल पर्व सुरु झालं, त्यातले सर्वात विश्वासू सहकारी म्हणून गहलोतांकडे पाहिलं जातं. पक्षाच्या संघटनेतलं अध्यक्षपदानंतरच सर्वात महत्त्वाचं असलेलं महासचिव हे पद गहलोतांना दिलं गेलं. गहलोत हे राजस्थानातले मास लीडर असल्याने आमदारांमध्ये लोकप्रिय आहेत.