हैदराबाद : शिवसेनेने 'सामना'या मुखपत्रातून केलेली बुरखाबंदीची मागणी आक्षेपार्ह आहे, या मागणीमुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. पोपट मास्तर आधी नरेंद्र मोदींना हरवण्याची भाषा करत होते. पण नंतर त्यांनी कोलांटउडी मारली आणि नरेंद्र मोदींसोबत गेली, अशी टीकाही ओवेसींनी शिवसेनेवर केली.

भारतात प्रत्येकाला निवडस्वातंत्र्य आहे. तुम्ही बुरखा घाला, नकाब घाला, घुंगट घ्या किंवा काहीही घालू नका, तुम्हाला संविधानाने 'चॉईस' दिला आहे. पण 'यांना' संविधान समजत नाही, दुसऱ्या देशात काय चालतं, यापेक्षा भारत समजून घ्यायला हवा, अशा शब्दात ओवेसींनी शिवसेनेवर निशाणा साधला.

शिवसेना मुस्लिमविरोधी वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही ओवेसींनी यावेळी केला. शिवसेनेची मागणी पेड न्यूज अंतर्गत येते, निवडणूक आयोगाने या सर्व गोष्टींची दखल घ्यावी, अशी विनंतीही ओवेसींनी केली.



पोपट मास्तर आधी नरेंद्र मोदींना हरवण्याची भाषा करत होते. पण नंतर त्यांनी कोलांटउडी मारली आणि नरेंद्र मोदींसोबत गेली, अशी टीकाही ओवेसींनी केली. साध्वी प्रज्ञासिंग, देवेंद्र गुप्ता यांनी बॉम्बस्फोट घडवाताना काय शेरवानी घातला होता का? असा सवाल यावेळी असदुद्दीन यांनी विचारला.


साखळी स्फोटांनंतर श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल यांनी घेतलेल्या बुरखाबंदीच्या निर्णयाची री शिवसेनेने ओढली होती. 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेने श्रीलंकेप्रमाणेच भारतातही बुरखा आणि नकाबबंदी घालण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे केली आहे. मोदी अयोध्या दौऱ्यावर असल्याने रावणाच्या लंकेत जे घडलं ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? असा सवालही शिवसेनेने पंतप्रधान मोदींना केला.