मुंबई : शिवसेना-भाजप युतीतीमधील नाराज राज्यमंत्री अर्जुन खोतकर आज दुपारी तीन वाजता सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेटीसाठी जाणार आहेत. या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर नाराज अर्जुन खोतकर जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवायची की नाही याचा निर्णय घेणार आहेत.

अर्जुन खोतकर यांनी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात दंड धोपटले आहेत. जालन्यात काल (4 मार्च) खोतकर यांच्या घरी झालेल्या दिलजमाई बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांच्या वतीने सहकारमंत्री सुभाष देशमुख मुंबईहून जालन्यात गेले होते. खोतकर, दानवे आणि देशमुख यांच्यात बंद दाराआड तासभर चर्चा झाली.

रावसाहेब दानवे यांनीही दोघांमध्ये सर्वकाही आलबेल असून चर्चा यशस्वी झाल्याचं वक्तव्य केलं होतं. दोघांमधील वाद मिटल्याचं दानवेंनी सांगितलं असलं तरी खोतकरांनी मात्र अजून मैदान सोडलेलं नाही. परंतु खोतकरांची नाराजी अद्यापही कायम असल्याचं कळतं.

युती होण्यापूर्वीपासूनच अर्जुन खोतकर दानवेंना टक्कर देण्यावर ठाम होते. युती झाली, तरीही शंभर टक्के मी जालन्यातून उभा राहणार आणि विजयीच होणार, असं अर्जुन खोतकरांनी ठणकावून सांगितलं होतं. भाजपची वागणूक खूप क्लेशदायक आहे. त्यांना खूप घमेंड, मस्ती आहे आणि ती मी उतरवणार, असा चंग अर्जुन खोतकरांनी बांधला होता.

युतीनंतर ही जागा भाजपला मिळणार आहे. तरीही दानवेंविरोधात मैत्रीपूर्ण निवडणूक लढवण्यावर खोतकर ठाम होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हीच संधी साधून काँग्रेस अर्जुन खोतकर यांना पक्षात घेऊन जालन्यातून उमेदवारी देणार असल्याचं म्हटलं जात होतं.

मी कुणालाही भेटलो नाही. काँग्रेसमध्ये जाण्याच्या बातम्यांना काही अर्थ नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेणार असल्याचं स्पष्टीकरण अर्जुन खोतकर यांनी दिलं. उद्धव ठाकरे निर्णय घेतील ते अंतिम राहील. मी ठाकरे घराण्याशी गद्दारी करणार नाही, असंही ते म्हणाले होते.