नागपूर : महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधवच्या शतकी भागीदारीच्या जोरावर टीम इंडियाने हैदराबादच्या पहिल्या वन डेत ऑस्ट्रेलियाला सहा विकेट्सनी धूळ चारली. हैदराबादमधल्या त्या दमदार विजयानंतर विराट कोहली आणि त्याचे शिलेदार मालिकेतल्या दुसऱ्या वन डेसाठी सज्ज झाले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला दुसरा वन डे सामना आज नागपूरच्या नव्या व्हीसीए स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.


इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकाआधीची टीम इंडियाची ही शेवटची वन डे मालिका आहे. त्यामुळे साहाजिकच टीम इंडियाच्या शिलेदारांच्या कामगिरीकडे भारतीय निवडसमितीचं लक्ष लागून राहिलं आहे.

हैदराबादच्या वन डे विजयाचा शिल्पकार आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर धोनीचा परतलेला फॉर्म ही टीम इंडियासाठी जमेची बाजू आहे. धोनीने 2019 या वर्षात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या चारही वन डेत अर्धशतकं झळकावली आहेत.

सिडनी वन डे : 96 चेंडूत 51 धावा

अॅडलेड वन डे : 54 चेंडूत नाबाद 55 धावा

मेलबर्न वन डे : 114 चेंडूत नाबाद 87 धावा

हैदराबाद वन डे : 72 चेंडूत नाबाद 59 धावा

यंदाच्या वर्षांत धोनीने 150 च्या सरासरीने सहा सामन्यात 301 धावा फटकावल्या आहेत. धोनीचा हाच फॉर्म विश्वचषकातही कायम राहावा अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.

धोनीसह केदार जाधवनेही हैदराबाद वन डेत मोलाची भूमिका बजावली होती. पार्ट टाईम गोलंदाज आणि मधल्या फळीतला भरवशाचा फलंदाज अशी दुहेरी जबाबदारी त्याने व्यवस्थितरित्या पार पाडली होती.

विश्वचषकाच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने नागपूर वन डेत भारतीय संघात बदलाची अपेक्षा आहे. सलामीच्या शिखर धवनऐवजी लोकेश राहुलचा अंतिम अकरात स्थान समावेश केला जाऊ शकतो. तर पहिल्या वन डेत संधी न मिळालेल्या रिषभ पंत, यजुवेंद्र चहल आणि शार्दूल ठाकूरलाही संघात स्थान मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकूणच हैदराबादमध्ये मिळालेल्या यशानंतर नागपूरमध्येही टीम इंडियाचे शिलेदार नव्या आत्मविश्वासानं मैदानात उतरतील. त्यामुळे आता नागपूरच्या रणांगणात टीम इंडिया मालिकेतली आघाडी वाढवणार की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.