Delhi High Court : सध्या पाच राज्यांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकांच्या निमित्ताने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. देशात एकीकडे कोरोनाचे संकट असतानाचं दुसरीकडे पाच राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. दरम्यान, देशात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. तसेच ओमायक्रॉनचा धोका देखील वाढत आहे. त्यामुळे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका रद्द कराव्यात यासाठी एका काँग्रेसच्या नेत्याने दिल्लीच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनावणी देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. जगदीश शर्मा असे याचिका केलेल्या काँग्रेस नेत्याचे नाव आहे. त्यांची याचिका अनावश्यक असल्याचे सांगत न्यायालयाने तुम्ही मंगळ ग्रहावर राहता का? असा सवाल याचिकर्त्याला केला आहे. कारण सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.


न्यायमूर्ती विपिन संघी आणि न्यायमूर्ती जसमीत सिंह यांच्या खंडपीठाने यावर नाराजी व्यक्त केली आहे. या याचिकेला कोणत्याही प्रकारचे महत्व देण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तुम्ही मंगळ ग्रहावर राहता का? दिल्लीत आता कोरोना केसेस कमी होत आहेत. तुम्ही ती याचिका परत घ्या नाहीतर नाहीतर आम्ही नाकारू असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यानंतर याचिकाकर्त्याच्या वकिलांनी ती याचिका मागे घेतली आहे. शर्मा यांनी याचिकेत कोविडची तिसरी लाट आणि ओमायक्रॉन संक्रमणाचा हवाला देत निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती केली होती.


दरम्यान, सध्या देशात कोरोनारुग्णांच्या वाढत्या प्रकरणांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळतंय. सलग तिसऱ्या दिवशी देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र, देशात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 2 लाख 09 हजार 918 जणांना कोरोनाची लागण झाली असून 959 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील सक्रिय प्रकरणांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे आणि आता त्यांची संख्या 18,84,937 वर आली आहे, जी एकूण संक्रमित संख्येच्या 4.59 टक्के आहे.  देशात गेल्या 24 तासांत 959 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशभरातील आकडेवारीत रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात कोविडमुळे 5 हजारांहून अधिक लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. तर, केरळमध्ये गेल्या 24 तासांत कोविडमुळे सर्वाधिक 374 जणांचा मृत्यू झाला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: