Hindustani Bhau Video: राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचं कारण देऊन दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार, असं शालेय शिक्षण विभागाकडून काही दिवसांपूर्वी स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र, दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी आज अचानक शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. नागपूर, अकोला, औरंगाबाद आणि पुण्यासह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आंदोलन सुरू केलंय. हिंदुस्थानी भाऊचा चार दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतरच विद्यार्थी आक्रमक झाल्याचं बोललं जातंय.
हिंदुस्थानी भाऊनं चार दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओत हिंदुस्थानी भाऊनं इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तसेच दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं न घेतल्यास मोठं आंदोलन करू, अशीही त्यानं धमकी दिली होती. "कोरोनामुळं गेल्या दोन वर्षात अनेक विद्यार्थ्यांचे मृत्यू झाले आहेत. या धक्क्यातून कुटुंब सावरलेलं नाही. आता ओमायक्रॉन आलाय. स्वतः सरकार म्हणतेय की घरात राहा, काळजी घ्या. मग सरकार विद्यार्थ्यांचा बळी का देत आहे? प्रोफेसर ऑनलाइन बैठक घेत आहेत. तुम्हाला तुमच्या जीवाची काळजी आहे, तर विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ का? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थांना ऑनलाईन शिक्षण दिलं जातंय. मग परीक्षा ऑफलाईन का? मी तुम्हाला विनंती करतोय की, विद्यार्थ्यांसोबत खेळू नका. कोरोनामुळं परिस्थिती गंभीर आहे. त्यांच्या भविष्याची खेळू नका, त्यावेळी मी एकटा रस्त्यावर उतरलो होतो. परंतु, आता लाखो विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरणार. दहावी- बारावीच्या परीक्षा रद्द करा किंवा ऑनलाईन पद्धतीन घ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी घ्या. नाहीतर एक मोठं आंदोलन उभं राहील. सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाहीतर तांडव होईल, गुन्हा दाखल केला तरी मी घाबरणार नाही", अशी धमकी हिंदुस्थानी भाऊनं व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे.
हिंदुस्थानी भाऊचा व्हिडिओ-
हिंदुस्तानी भाऊ कोण आहे?
विकास जयराम पाठक ही मुंबईकर व्यक्ती हिंदुस्तानी भाऊ म्हणून सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध आहे. देशाविरोधात भाष्य करणाऱ्यांची हिंदुस्तानी भाऊ आपल्या शैलीत फिरकी घेतो. भाऊचे टिकटॉकवर 6 लाख, तर यूट्युबवर तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्याची तरुणाईमध्ये चांगलीच क्रेझ आहे. बिग बॉस या रिऍलिटी शोमध्येही त्याची निवड झाली होती. पुलवामा हल्ल्यानंतर भारताविषयी बोलणाऱ्यांना चपराक लगावण्यासाठी त्यानं सहजच एक व्हिडीओ बनवला होता. या व्हिडीओला चांगले हिट्स मिळाले. त्यानंतर विकासचं ‘हिंदुस्थानी भाऊ’ असं नामकरण झालं.
हे देखील वाचा-
- Student Protrest : दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर, कोरोना नियमांचा फज्जा
- बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन, पाहा लाईव्ह अपडेट
- Mhada Exam : राज्यभरातील 106 केंद्रावर म्हाडाची परीक्षा आजपासून सुरू, 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान होणार परीक्षा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha