मुंबई: अंधेरी पूर्वची जागा शिंदे गट लढवणार की भाजप हा तिढा आता सुटला असून मुरजी पटेल यांना भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही जागा आता शिंदे गटाला न जाता या ठिकाणी भाजप निवडणूक लढणार आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विरुद्ध भाजपचे मुरजी पटेल हा सामना रंगणार आहे.
अंधेरी पूर्वची जागा शिवसेनेकडे असल्याने या जागेवर शिंदे गटाकडू दावा केला जात होता. त्यामुळे मुरजी पटेल नेमकं कुणाच्या चिन्हावर निवडणूक लढणार याबद्दल संदिग्धता होती. मात्र आज संध्याकाळी वर्षा या निवासस्थानी भाजप नेते आशिष शेलार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. त्यामध्ये ही जागा भाजपला सोडण्यावर दोन्ही बाजूने एकमत झालं. त्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुरजी पटेल यांना कॉल करून कमळ या चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या सूचना दिल्या.
अंधेरी पूर्व मतदारसंघात शिंदे गटापेक्षा भाजपची मोठी ताकत असल्याने या जागेसाठी भाजप आग्रही होता. त्यांचा उमेदवारही ठरला होता. मुरजी पटेल यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली होती. पण शिंदे गटाकडूनही या जागेवर दावा करण्यात येत होता. शिंदे गटाच्या ढाल तलवार या चिन्हावर मुरजी पटेल यांनी निवडणूक लढवावी असाही एक मतप्रवाह निर्माण झाला होता.
त्यानंतर आज ही जागा भाजपच लढवेल यावर एकमत झालं. त्यामुळे मुरजी पटेल उद्या आपल्या उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत.
2019 मध्ये विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्यावर मुरजी पटेल यांनी अपक्ष ही निवडणूक लढवली. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व मतदारसंघात जवळपास 1 लाख 47 हजार 117 मतदान झाले होते. त्यापैकी रमेश लटके यांना 62 हजार 773 मतं मिळाली. तर मुरजी पटेल यांना 45 हजार 808 मतं होती. 2020 मध्ये मुरजी पटेल यांची भाजपच्या मुंबई उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या महामंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली.
दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरेंच्या गटाकडून ऋतुजा लटके यांचं नाव अंतिम झालं असून त्या आपला उमेदवारी अर्ज उद्या भरणार आहेत. त्यांनी महापालिकेतील सेवेचा राजीनामा दिला होता. पण महापालिका प्रशासनाने त्यांचा हा राजीनामा स्वीकारला नव्हता. महापालिका प्रशासनाच्या विरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
ऋतुजा लटके यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने महापालिकेला उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांचा राजीनामा स्वीकारायला सांगितला आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे.
अंधेरी पूर्व मतदारसंघात सध्या तरी ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा थेट सामना टळलाय.