मुंबई: अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आता भाजपवर दबाव वाढताना दिसत आहे. आधी राज ठाकरे, नंतर शरद पवार आणि आता शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ही मागणी केली आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू होतो, त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांना बिनविरोध निवडून देण्याचा पायंडा आहे, महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती असल्याचं प्रताप सरनाईक यांनी या पत्रात नमूद केलं आहे. त्यामुळे भाजप आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, तुम्ही तुमच्या राजकीय वजनाचा वापर करुन भाजपशी संवाद साधावा आणि ही निवडणूक बिनविरोध कशी होईल हे पाहावं. कारण आपली राजकीय संस्कृती असं सांगते की एखाद्या नेत्याचं निधन झालं की त्याच्या कुटुंबातील सदस्याला बिनविरोध निवडून दिलं जातं. त्यामुळे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपावं. 


आधी राज ठाकरे आणि नंतर शरद पवार यांनी अंधेरी पूर्वची निवडणूक बिनविरोध करावी अशी मागणी केली होती. आता शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ही मागणी केल्यानंतर भाजपवर राजकीय दबाव निर्माण झाला आहे. 


आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. दरम्यान, भाजपची आज महत्त्वपूर्ण बैठक होत असून त्यामध्ये अंधेरीच्या निवडणुकीवर चर्चा करण्यात येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे अंधेरीची निवडणूक बिनविरोध होणार का, भाजप काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


काय म्हणाले होते शरद पवार? 


अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करणे योग्य होईल आणि याने महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांचं समर्थन करत आज पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, "अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. रमेश लटके यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ऋतुजा रमेश लटके या निवडणूक लढत आहे. मुरजी पटेल यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्रत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली.  मी राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणून तेव्हा भूमिका घेतली होती की, मुंडेच्या परिवारातील कोणीही उभा राहत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उभा करणार नाही."