Amit Thackeray मुंबई: मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. माहीममधून मनसेकडून अमित ठाकरे (Amit Thackeray), शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत (Mahesh Sawant) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत अंदाजे 6.25 टक्के मतदान झालं. यामध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत माहीम विधानसभा मतदारसंघात 8.14 टक्के मतदान झालं.
मनसेशिवाय सत्ता स्थापन होणार नाही-
अमित ठाकरे यांनी देखील सकाळी मतदान केलं. तर राज ठाकरे, शर्मिला ठाकरे यांनी देखील मतदान केलं. यावेळी अमित ठाकरेंनी राज्यासह माहीमधील जनतेला महत्वाचं आवाहन केलं आहे. माहीम-दादरमधील नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावं, असं आवाहन देखील अमित ठाकरेंनी केलं. तसेच मी दाव्याने सांगतो, मनसेशिवाय राज्यात सत्ता स्थापन होणार नाही, असा दावाही अमित ठाकरेंनी केला आहे. मी लोकांपर्यंत पोहचलो आहे. मी डोअर टू डोअर प्रचार केला. मला जे करायचं आहे, ते मी लोकांपर्यंत पोहचवलं आहे, असं अमित ठाकरेंनी सांगितले.
अमित ठाकरे आणि सदा सरवणकरांची भेट-
मतदान करण्याआधी सदा सरवणकर सिद्धिविनायक मंदीरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी अमित ठाकरे देखील सिद्धिविनायक मंदीरात दर्शनासाठी आले होते. अमित ठाकरे आणि सदा सरवणकर यांची यावेळी भेट झाली. दोघांनी हस्तांदोलन देखील केलं आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
मनसेच्या पाठिंब्यावरच मुख्यमंत्री होईल- राज ठाकरे
विधानसभा निवडणुकांमध्ये यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होत आहे. मात्र, तिसरी आघाडी, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी हे देखील पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत. मनसेनंही 100 पेक्षा अधिक जागांवर आपले उमेदवार उभे केले असून यंदा एकला चलो रे चा नारा दिला आहे. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीतील निकालाची सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यातच, राज ठाकरे यांनी महाराष्ट्र व्हिजन या कार्यक्रमातून यंदाचा म्हणजेच 2024 चा मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल, तर 2029 चा मुख्यमंत्री मनसेचा असेल, असे भाकीत केले. त्यामुळे, राज ठाकरेंनी एकप्रकारे देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याचे सूचक विधान केलं आहे. तसेच, मनसेच्या पाठिंब्यावरच हा भाजपचा मुख्यमंत्री होईल, असेही राज ठाकरे यांनी एबीपी माझाच्या कार्यक्रमात म्हटलं होतं.