Amit Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) हे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जास्त चर्चेत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अमित ठाकरे पहिल्यांदाच उतरले आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणुक लढणार आहे. मनसेकडून अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर आणि शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत अशी तिरंगी लढत माहीम विधानसभेत होणार आहे.


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरेंनी साम या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मला राजकारणात कधीच यायचं नव्हतं पण 2014 नंतर जी पक्षाची पडझड सुरू झाली, त्यावेळी असा विचार आला की साहेबांनी मोठ्या प्रयत्नाने, मेहनतीने हा पक्ष उभा केला त्याला माझा कुठेतरी हातभार लागावा हा त्यात उद्देश होता. लोकांचे काम झाल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो, तो आनंदच मला उभारी देतो. मला तो चेहऱ्यावरचा आनंद महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर पाहायचा आहे, असं अमित ठाकरे म्हणाले. 


माजी मंत्री आणि वरळीचे विद्यामान आमदार आदित्य ठाकरे यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली होती. मुंबईतील वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यावेळी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिला नव्हता. मात्र यंदा म्हणजेच 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंविरोधात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यावर देखील अमित ठाकरेंनी भाष्य केलं आहे. 


...तर आम्हीही उमेदवार दिला नसता- अमित ठाकरे


मागच्या पाच वर्षात जर वरळीकरांची काम झाली असती तर आताही आम्ही उमेदवार दिला नसता. आम्ही जनतेला गृहीत धरू शकत नाही. एक नातं म्हणून मागच्या वेळी मदत केली, काम केले नाही मग ती मदत परत कशी मिळेल? एक आमदार जिथे उपलब्ध असायला हवा तिथे आदित्य ठाकरे नव्हता. लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे म्हणजे तुम्ही लोकांचे प्रतिनिधी असता, मग त्यांच्यासाठी तुम्ही उपलब्ध असायला हवं. आता मला जर लोकांनी निवडून दिलं आणि मी लोकांसाठी उपलब्ध नाही राहिलो तर मला पण घरी बसवा. फुकट मिळाल्यावर लोकांना किंमत नसते तसंच काहीसं त्यांनी केलं, अशी टीका अमित ठाकरेंनी केली. 


अमित ठाकरेंना पाठिंबा देणे आमचेही कर्तव्य- दीपक केसरकर


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेला एकही जागा न घेता महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आमचेही कर्तव्य आहे की, अमित ठाकरे यांना पाठिंबा देणे. मात्र, तिथे आमचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्याशी बोलणे सुरू आहे. त्यांचा योग्य तो मान राखून सन्मान दिला जाईल. या ठिकाणी तोडगा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काढणार आहेत.  अमित ठाकरेंना पाठिंबा देणं काम आहे, राज ठाकरेंना पाठिंबा देणं आमचं काम आहे, असं विधान मंत्री दीपक केसरकर यांनी केलं. दीपक केसरकरांच्या या विधानामुळे महायुती अमित ठाकरेंना पाठिंबा देणार का?, तसेच सदा सरवणकर निवडणुकीतून माघार घेणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


संबंधित बातमी: 


Amit Thackeray: धाकटे बंधू अमित ठाकरेंच्या उमेदवारीवरुन आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...