लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासाठी अमित शाहांचं मिशन 45, शिवसेनेसोबतच्या युतीचा उल्लेखही नाही
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 09 Feb 2019 05:54 PM (IST)
भाजपच्या आढावा बैठकीत अमित शाहांनी महाराष्ट्रासाठी भाजपचं 'मिशन 45' मांडलं. 45 पेक्षा कमी जागा मिळाल्या, तर त्याला विजय मानता येणार नाही. या 45 जागांमध्ये बारामतीचाही समावेश असेल, असं अमित शाह म्हणाले.

पुणे : भाजपच्या विजयाचा मेरु, आता कोणीही रोखू शकणार नाही, असा एल्गार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पुण्यात केला. विशेष म्हणजे अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यापैकी कोणीही शिवसेना किंवा युतीचा साधा उल्लेखही भाजपच्या आढावा बैठकीत केला नाही. भाजपच्या बैठकीत अमित शाहांनी महाराष्ट्रासाठी भाजपचं 'मिशन 45' मांडलं. 45 पेक्षा कमी जागा मिळाल्या, तर त्याला विजय मानता येणार नाही. या 45 जागांमध्ये बारामतीचाही समावेश असेल, असं अमित शाह म्हणाले. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलताना बारामतीसह 43 जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला होता. महाराष्ट्रात 45 जागा जिंकल्या तर केरळमध्येही भाजपची सत्ता असेल, असा विश्वासही शाहांनी व्यक्त केला. आसाम, त्रिपुरामध्ये भाजपची सत्ता येईल, असं कोणालाही स्वप्नातही वाटलं नव्हतं, असंही शाह म्हणाले.