मुंबई : भाजप अध्यक्ष अमित शाह यांना अफजलखानाची उपमा देणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शाह यांच्या लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गांधीनगरला गेले होते. यावेळी दोघांनी एकमेकांना मिठी मारत शुभेच्छा दिल्या. या भेटीनंतर काँग्रेस आणि सोशल मीडियावर टीका आणि या भेटीची खिल्ली उडवली जात आहे.


VIDEO | उद्धव ठाकरेंसह अनेक नेते गुजरातमध्ये दाखल, सेल्फीसाठी चाहत्यांची गर्दी | अहमदाबाद | एबीपी माझा


दुसरीकडे या भेटीनंतर अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांचे ट्विटरवरुन  आभार मानले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मी आभार मानतो. भाजपा-शिवसेना युती ही राष्ट्रवाद मानणाऱ्या दोन पक्षाची युती आहे, असे शाह यांनी म्हटले आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मिळून महाराष्ट्रातील सर्व लोकसभेच्या जागा बहुमताने जिंकून देतील. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते युतीला मोठा विजय मिळवून देतील आणि नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवतील, असे त्यांनी म्हटले आहे.


माझ्या गांधीनगरमध्ये येण्यानं अनेकांच्या पोटात दुखतंय. भाजप आणि आमच्यात मतभेद होते, पण आता आमची मनं जुळलीत असं प्रतिपादन उद्धव ठाकरेंनी शाह यांच्या रॅलीत बोलताना केलं होतं. यावेळी विरोधकांचा नेता कोण? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता.
अफझलखानाच्या भेटीला शिवसेनेच्या उंदरांची फलटण, काँग्रेसची टीका
अमित शाहांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरेंनी जाणं म्हणजे अफझलखानाच्या भेटीला शिवसेनेच्या उंदरांची फलटण जाणं आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंचं कान पकडून त्यांनी त्यांना खडसावले असते आणि उठाबशा करायला लावल्या असत्या, असा टोलाही सावंत यांनी लगावला आहे.

शिवसेनेचे नेते जरी भाजपच्या मांडीवर जाऊन बसले असले तरी बहुतांश शिवसैनिकांना मात्र हे मान्य नाही, यावेळी शिवसैनिक देखील भाजप-शिवसेनेच्या विरोधात मतदान करेल असेही सावंत यावेळी म्हणाले. ही महायुती नसून देशासमोर महाआपत्ती आहे, ही आपत्ती निवारण करण्यासाठी देश सज्ज झाला आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये काँग्रेस विरोधात लढणाऱ्या दोन्ही पक्षांकडे स्वाभिमान नाहीये, असेही ते म्हणाले. सचिन सावंत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात काँग्रेस उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला आले होते. त्यावेळी त्यांनी विनायक राउत आणि निलेश राणे हे दोन्हीही उमेदवार मोदींच्या कडेवर बसलेले आहेत, अशी टीका केली.

जोरदार शक्तीप्रर्शन करत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज (30 मार्च) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून अमित शाह यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अमित शाहांना पाठिंबा दर्शवण्यासाठी एनडीएतील अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिरोमणी अकाली दलाचे प्रकाशसिंह बादल, लोक जनशक्ती पार्टीचे रामविलास पासवान केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह, अरुण जेटली यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.