पणजी : उद्या जर गठबंधन सरकार आलं, तर सोमवारी मायावती पंतप्रधान असतील, मंगळवारी अखिलेश, बुधवारी देवेगौडा, गुरुवारी चंद्राबाबू नायडू, शुक्रवारी स्टेलिन, तर शनिवारी शरद पवार पंतप्रधान असतील आणि रविवारी देशाला सुट्टी असेल, असं म्हणत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित अमित शाहांनी गठबंधनमधील घटकपक्षांवर तोफ डागली.


काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गोवा दौऱ्यात अनपेक्षितपणे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली आणि त्या भेटीशी 'राफेल'ला जोडून तुच्छ राजकारण केलं आहे, असा घणाघातही शहा यांनी केला. गोव्यात पणजीजवळ भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शहा गोव्यात आले होते.

55 वर्ष राज्य करुनही देशाला अपेक्षित विकासापर्यंत नेण्यास अपयशी ठरलेल्या काँग्रेसला आमच्या 55 महिन्यांच्या कामाची माहिती मागण्याचा अधिकार नसल्याचंही शाह म्हणाले. आजारी असूनही गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर राज्याच्या विकासाचे प्रश्न घेऊन केंद्राकडे सतत पाठपुरावा करत असतात. त्यांच्यासारखा मुख्यमंत्री आपण आयुष्यात पाहिला नाही, अशा शब्दात शाहांनी पर्रिकरांवर स्तुतिसुमनं उधळली.

भाजपचा कार्यकर्ता कसा निष्ठेने काम करतो त्याचं पर्रिकर हे उत्तम उदाहरण आहेत. पर्रिकर आणि मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची संरक्षण व्यवस्था भक्कम करण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केल्याचा दावा अमित शाहांनी सर्जिकल स्ट्राईकचं उदाहरण देत केला.

शाहांनी गोव्यात येताच मनोहर पर्रिकर यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. त्यानंतर पर्रिकर यांनी आपण कार्यकर्त्यांशी बोलण्यासाठी तुमच्या सोबत येत असल्याचं सांगत सभास्थळ गाठलं. पर्रिकर यांनी बसून भाषण करताना केंद्रात मोदी यांचे सरकार पुन्हा आणण्यासाठी छोटे मोठे मतभेद विसरुन एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.