शरद पवारांना नितीन गडकरींची काळजी वाटते...
एबीपी माझा वेब टीम | 09 Feb 2019 08:58 PM (IST)
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा गडकरींचे कौतुक केले होते. सोबतच नितीन गडकरींच्या कामांचे सोनिया गांधींनी देखील कौतुक केले होते. सोनिया गांधी यांनी लोकसभेत बाक वाजवून नितीन गडकरींच्या कामाची प्रशंसा केली होती.
सांगोला : नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा पंतप्रधानपदासाठी सुरु झाली ही आनंदाची गोष्ट आहे. गडकरी माझे चांगले मित्र असल्याने आता मला त्यांची काळजी वाटू लागली आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षशरद पवारांनी म्हटले आहे. शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज सांगोल्यात दुष्काळी परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गडकरींच्या पंतप्रधानपदासंबंधी प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी नितीन गडकरी विधिमंडळापासूनचे आपले सहकारी आहेत. पंतप्रधानपदासाठी आता त्यांचे नाव येत असल्याने मला त्यांची चिंता वाटते असे शरद पवार म्हणाले. पंतप्रधानपदासाठी गडकरींच्या नावाची चर्चा होत असतानाच गडकरींनी काही विधानांनी राजकीय आखाड्यात चर्चा रंगू लागल्या आहेत. यावेळी पवारांनी ही चिंता व्यक्त केली आहे. गडकरींनी आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही असे सांगून या चर्चांना पूर्णविरोम देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गडकरींच्या नावाची चर्चा काही थांबत नाहीयेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा गडकरींचे कौतुक केले होते. सोबतच नितीन गडकरींच्या कामांचे सोनिया गांधींनी देखील कौतुक केले होते. सोनिया गांधी यांनी लोकसभेत बाक वाजवून नितीन गडकरींच्या कामाची प्रशंसा केली होती. दरम्यान अमरावती येथील ज्योतिष परिषदेने नितीन गडकरी देशाचे पंतप्रधान होतील अशी भविष्यवाणी वर्तवली आहे. ज्योतिषी भूपेश गाडगे यांनी ग्रह आणि पत्रिकेच्या आधारे ही भविष्यवाणी वर्तवली आहे. वाजपेयीबरोबर अमित शहांची तुलना करणे हा विनोद : शरद पवार वाजपेयींसारखा नेता असताना सुद्धा आम्हाला बहुमत मिळू शकलं आणि आम्ही यशस्वीपणाने दहा वर्षे राज्य केलं. मात्र वाजपेयींच्या बरोबर अमित शाहांशी तुलना करणे हा विनोदचं होईल, असे म्हणत शाहांना टोला लगावला.