मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या काही तासांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पाठिंबा देण्याची अजित पवार यांची कथित स्मार्ट खेळी आता त्यांच्यासाठीच अडचण ठरत असल्याची माहिती समोर आली आहे. कारण, सोमवारी अमित शाह (Amit Shah) यांच्या भेटीसाठी दिल्लीत गेलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर तिष्ठत बसण्याची वेळ आली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावाला तत्परतेने दिलेल्या पाठिंब्यामुळे महायुतीचे वरिष्ठ नेते नाराज आहेत का, अशी कुजबुज सुरु आहे. त्यामुळे आता अजित पवार यांना अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीत ताटकळत बसण्याची वेळ आल्याचे सांगितले जाते.
राज्यात एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरु असणाऱ्या दबावतंत्रामुळे आपल्या वाटच्या खात्यांना कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी अजित पवारांनी सोमवारी अचानक दिल्ली गाठल्याची चर्चा होती. अजित पवार हे दिल्लीत अमित शाह यांना भेटायला आले होते. मात्र, अमित शाह हे अजित पवार यांना न भेटता चंदीगढला निघून गेले. चंदीगढमध्येय फौजदारी कायद्यासंदर्भातील एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदी आणि अमित शाह दोघेही हजर होते. त्यामुळे अजित पवार यांना दिल्लीत ताटकळत बसावे लागले. अमित शाह यांच्यासोबत त्यांचा मुलगा पार्थ पवार, खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलही उपस्थित आहेत. अमित शाह यांची भेट घेण्याच्या उद्देशाने या सगळ्यांची एक बैठक झाली होती. मात्र, अमित शाह आणि पंतप्रधान मोदी चंदीगढला निघून गेल्यामुळे अजितदादांना दिल्लीतील मुक्काम वाढवावा लागला.
या सगळ्याविषयी अजित पवार यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून आम्ही दिल्लीत फिरायला आल्याचे सांगण्यात आले. सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार आहेत. त्यामुळे आम्ही दिल्लीत आल्याची सारवासारव अजितदादांकडून करण्यात आली. आता किमान मंगळवारी तरी अजितदादांना अमित शाह यांची भेट मिळणार का, हे बघावे लागेल. या बैठकीत अजित पवार आणि अमित शाह यांच्यात काय चर्चा होणार, हे बघावे लागेल.
अजितदादा करायला गेले एक अन् झालं भलतंच
भाजपने अजित पवार यांना सोबत घेतले तेव्हा अनेक निष्ठावंत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नाराजी व्यक्त केली होती. या सगळ्यांना अजित पवार यांच्या विश्वासर्हतेबाबत शंका होती. त्यादृष्टीने अजित पवार यांनी महायुतीचा आपल्यावरील विश्वास वाढावा यासाठी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या काही तासांमध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा देऊ केला. यामुळे अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवरही कमी केली होती. या खेळीमुळे भाजप नेतृत्त्वाचा आपल्यावरील विश्वास वाढेल, असे अजित पवार यांना वाटले होते. मात्र, आता प्रत्यक्ष परिस्थिती पाहता 'अजितदादा करायला गेले एक अन् झालं भलतंच', असे दिसत आहे.
कारण महायुतीच्या नेत्यांना अजित पवार यांनी परस्पर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदासाठी दिलेला पाठिंबा रुचलेला नाही, अशी चर्चा आहे. तुम्ही फडणवीसांना पाठिंबा देऊन महायुतीच्या सर्व निर्णयांना समर्थन दिले होते. मग आता तुमच्या मागण्यांवर वेगळी चर्चा करण्यात काय अर्थ आहे? तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या असतील तर आता मग त्याबाबत काय बोलायचे, असा सवाल भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांकडून विचारला जात आहे. त्यामुळे अजित पवार यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा