सांगली : काँग्रेसवाले काश्मीरला भारतापासून तोडायची भाषा करत आहेत, देशात दोन पंतप्रधान करण्याची मागणी हे लोकं करत आहेत. घुसखोरांचं समर्थन देखील काँग्रेसवाले करत आहेत. मात्र भारतीय जनता पक्षात जोवर जीव आहे तोवर काश्मीरला भारतापासून कुणीही वेगळं करू शकणार नाही, असे प्रतिपादन भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केली आहे.


अमित शाह सांगलीत संजय पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, एअर स्ट्राईकद्वारे पाकला घरात घुसून मारले, तरीही काँग्रेस आणि विरोधी  पक्षांकडून संशय घेतला जात आहे. देशाला सुरक्षित करण्याचे काम मोदी सरकारने केलं आहे, असे शाह यावेळी म्हणाले.

पुलवामा सारख्या हल्ल्यानंतर जेव्हा एअर स्ट्राईकने उत्तर दिले जाते तेव्हा त्याचे पुरावे मागितले जातात. ही किती दुर्दैवी घटना आहे असे शाह यांनी म्हटलं आहे. आम्ही देशात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना शोधून मारू असे सांगत दहशतवादाप्रती भाजपचा झिरो टॉलरन्स असल्याचेही ते म्हणाले.


15 वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारकडून महाराष्ट्राचं नुकसान केलं आहे. राष्ट्रवादीनं 72 हजार कोटींचा सिंचन घोटाळा केला. मात्र भाजपने सिंचन क्षेत्रात मोठं काम केलं आहे, असे शाह म्हणाले. गरिबांना घर, आरोग्य, पाणी देण्याचं काम भाजपनं केलं आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांना भाजपनं दिलासा दिला असल्याचे देखील ते म्हणाले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन दिलासा दिला आहे. जोवर अंतिम शेतकऱ्याला कर्जमाफी मिळत नाही तोवर ही प्रक्रिया सुरु ठेवण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोललो असल्याचे देखील शाह म्हणाले.