Continues below advertisement

अकोला : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी युती आणि आघाडी अंबरनाथ नगरपालिका आणि अकोल नगरपालिकेत झाली होती. मात्र, याबाबत वरिष्ठांना समजताच भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे, संबंधित स्थानिक नेत्यांकडून ही युती मागे घेतली जात असल्याचंही पाहायला मिळालं. अकोला जिल्ह्यात भाजप आणि एमआयएम (MIM) यांच्यात युती झाली होती. मात्र, आता एमआयएम अकोटमधील (Akola) भाजपच्या नेतृत्वाखालील 'अकोट विकास मंचा'तून बाहेर पडले आहे. तर, भाजप (BJP) प्रदेशाध्यक्षांकडूनही विधानसभा आमदार प्रकाश भरसाखळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर, अंबरनाथमधील भाजप नेते नरेंद्र पवार यांनी ही युती नसून काँग्रेसने भाजपला विकासासाठी समर्थन दिले आहे, तरीही पक्षाचा आदेश आम्हाला मान्य आहे, असे स्पष्टीकरण दिलं.

स्थानिक आघाडीतून बाहेर पडत असल्याचे एमआयएमचे पत्र 'एबीपी माझा'च्या हाती आले असू पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष युसूफ पुंजांनींनी हे पत्र दिले आहे. त्यानुसार, एमआयएमच्या अकोट नगरपालिकेतील पाचही नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी भाजपसमवेतच्या आघाडीतून बाहेर पडत असल्याचे पत्र दिले. अकोट नगरपालिकेत हिंदुत्वाच्या बाता करणाऱ्या भाजपची 'एमआयएम'शी आघाडी झाली होती. नगरपालिकेत बहुमत नसलेल्या भाजपने 5 नगरसेवक असलेल्या 'एमआयएम'ला घेतले सोबत होते. मात्र, भाजप नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही युती मान्य नसल्याचे सांगत कारवाईचा इशारा दिला होता. त्यानुसार, भाजपकडून कारवाईला सुरुवात झाली आहे. आता, एमआयएम'नेही भाजपला दिलेलं समर्थन मागे घेतले. भाजपने स्थापन केलेल्या 'अकोट विकास मंचा'त एमआयएम दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी आणि बच्चू कडूंची 'प्रहार जनशक्ती पार्टी सहभागी झाली होती. मात्र, आता या युतीमधून एमआयएम बाहेर पडलं आहे.

Continues below advertisement

भाजपकडून कारणे दाखवा नोटीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काँग्रेस आणि एमआयएम समवेत झालेल्या युतीवरुन कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर, अकोट येथील एमआयएमच्या युतीच्या संदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्षांनी कडक पाऊल उचलले आहे. येथील विधानसभा आमदार प्रकाश भरसाखळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पक्षाची प्रतिमा मलिन झाली, आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये?’ असे भाजप प्रदेशाध्यक्षांनी पत्रातून विचारले आहे. त्यामुळे, आता भाजप नेते यावर काय खुलासा देणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजपच्या आघाडीतून बाहेर पडलेले एमआयएमचे पाच नगरसेवक :

1) रेश्मा परवीन मोहम्मंद अजीम

2) युसुफ खान हादीक खान -

3) हन्नान शाह सुलतान शाह-

4) दिलशाद बी रज्जाक खाँ -

5) अफरीन अंजुम मो. शरीफोद्दीन

हेही वाचा

काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच