बारामती: लोकसभा निवडणुकीला आपण चूक केली, अशी भावना बारामतीच्या मतदारांमध्ये आहे. त्यांना आता ही चूक सुधारायची आहे. त्यामुळे बारामती विधानसभा निवडणुकीत अजितदादांचा विजय नक्की आहे, असे वक्तव्य सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी व्यक्त केले. यंदाची विधानसभा निवडणूक वेगळी आहे. आजच्या सभेला जो प्रतिसाद आहे, तो पाहता ही विधानसभेतील विजयाची नांदी आहे, असे वाटत असल्याचे सुनेत्रा पवार यांनी म्हटले. 


बारामतीच्या मतदारांना आता वाटत आहे की, आपण गेल्यावेळेस थोडी चूक केली.  ही चूक आता त्यांना सुधारायची आहे. त्यांना 24 तास झटणारा माणूस हवा आहे. गेली 35 वर्षे दादांनी बारामतीच्या मतदारांची सेवा केली आहे. ही गोष्ट बारामतीकरांच्या मनात आहे. याचा प्रभाव त्यांच्या मनात आहे, असेही सुनेत्रा पवार यांनी म्हटले.


कुटुंबात पहिल्यांदाच लढाई होत नाही: सुनेत्रा पवार


सुनेत्रा पवार यांना बारामतीची लढाई ही पुन्हा कुटुंबात होणार असल्याविषयी विचारण्यात आले. यावर सुनेत्रा पवार यांनी म्हटले की, आता कुटुंबात पहिल्यांदा लढाई होत नाही. आता नाता नात्याच्या जागेवर आणि राजकारण राजकारणाच्या जागेवर आहे. पूर्वी एक समीकरण होतं लोकसभेला सुप्रियाताई आणि विधानसभेला अजितदादांना मत द्यायचे. बारामतीमध्ये तसा पायंडाच पडला होता. त्या पद्धतीने बारामतीच्या जनतेने मतदान केले. मात्र, आता जनतेला माहिती आहे दादांशिवाय तुल्यबल कोणी नाही, कष्ट करणारा कोणी नाही. त्यामुळे बारामतीच्या लढाईत अजित पवार हेच विजयी होतील, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले.


बारामतीचे मतदार युगेंद्रला मोठ्या मताधिक्याने निवडून देतील: शरद पवार


अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवार यांनी सोमवारी सकाळी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, मला असं वाटतं की, मी हे म्हणणे योग्य आहे की नाही, मला माहिती नाही. पण बारामतीची मला जितकी माहिती आहे, तेवढी माहिती मर्यादित लोकांनाच असेल. माझा बारामतीकरांवर पूर्ण विश्वास आहे. मला बारामतीकरांनी 1965 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात शक्ती दिली. नंतरच्या काळात बारामतीमधून उभं न राहताही येथील जनतेने मला साथ दिली. त्यामुळे आता युगेंद्र पवार यांनाही बारामतीची जनता मोठ्या मताधिक्याने विजयी करेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.


आणखी वाचा


कुस्तीच्या मैदानात उतरण्याआधी वस्तादाचे पैलवानांना दोन सल्ले, युगेंद्र पवारांबद्दल बोलताना शरद पवार नेमकं काय म्हणाले?