मुंबई : पाच वर्षे झाले तरीही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचे कवित्व अद्यापही संपत नसल्याचं दिसतंय. त्याला कारण म्हणजे अजित पवारांनी केलेलं ताजं वक्तव्य. 2019 साली भाजपसोबत जायचं ठरल्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक झाली. त्या बैठकीला उद्योगपती गौतम अदानी उपस्थित होते असा अजित पवारांनी सांगितलं. न्यूज लॉन्ड्री या यूट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी हे वक्तव्य केलं आहे. 


गेल्या विधानसभेच्या निकालानंतर राज्यात शिवसेना भाजप युतीला बहुमत मिळालं होतं. पण मुख्यमंत्रिपदावरून बोलणी फिस्कटली आणि युतीही तुटली. त्यावेळी महाविकास आघाडीच्या निर्मितीची चर्चा सुरू असतानाच अचानक भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी शपथ घेतल्याचं समोर आलं. नंतर हे सरकार काहीच तासांमध्ये कोसळलं आणि अजित पवार स्वगृही परतले. त्याच्यावर अजूनही अनेकदा चर्चा सुरू असतात. त्यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीला एकत्र आणण्यासाठी दिल्लीतील एका उद्योगपतीच्या निवासस्थानी बैठक झाल्याची चर्चा होती. आता अजित पवारांनी ते उद्योगपती गौतम अदानी असल्याचं जाहीर केलं. 


बैठकीला गौतम अदानी उपस्थित


अजित पवार म्हणाले की, "राष्ट्रवादी आणि भाजपचे सरकार राज्यात आणण्यासाठी दिल्लीत पाच बैठका झाल्या. एक बैठक उद्योगपती गौतम अदानींच्या घरी झाली. यामधील एका बैठकीला अमित शाह, गौतम अडाणी, देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल, पवार साहेब आणि आपण स्वतः उपस्थित होतो. त्या गोष्टी सगळ्यांनाच माहिती आहेत."


त्या गोष्टी आता काढून काही फायदा नाही असं सांगत अजित पवार म्हणाले की, त्या गोष्टीचा सर्व दोष माझ्यावर आला. त्या गोष्टीची संपूर्ण जबाबदारी मी घेतली आणि इतर नेत्यांना वाचवलं. 


शरद पवारांच्या मनात काय ते काकीही सांगू शकत नाहीत


या सर्व गोष्टी घडत असताना शरद पवारांच्या मनात काय होतं असा प्रश्न विचारल्यानतंर अजित पवार म्हणाले की, "शरद पवारांच्या मनात काय आहे हे जगातली कोणताही व्यक्ती सांगू शकत नाही. आमच्या काकीही सांगू शकत नाहीत."


ही बातमी वाचा: