सांगली : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर होऊन दोन दिवस झालेत. महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप पूर्ण झालेलं नाही. महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकांचं सत्र सुरु आहे. जागावाटपाच्या चर्चेसाठी महायुतीचे प्रमुख नेते आज पुन्हा दिल्लीला जाणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. सांगली जिल्ह्यात जिथं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार 2019 च्या विधानसभेवेळी निवडून आले होते त्या जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार 2019 ला सांगली जिल्ह्यातून विजयी झाले होते. त्यापैकी तासगाव कवठेमहांकाळ आणि इस्लामपूरची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार असल्याच्या चर्चा आहेत.
सांगलीत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून गेल्यावेळी इस्लामपूरमधून जयंत पाटील, तासगाव कवठेमहांकाळमधून सुमनताई पाटील आणि शिराळा मतदारसंघातून मानसिंगराव नाईक आमदार झाले होते. यापैकी इस्लामपूर आणि तासगाव कवठेमहांकाळची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल.
जयंत पाटील आणि रोहित पाटील यांच्या विरोधात कोण लढणार?
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून जयंत पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 24 सप्टेंबरला जयंत पाटील अर्ज दाखल करणार आहेत. या ठिकाणी अजित पवार कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर, तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून यावेळी सुमनताई पाटील यांच्या ऐवजी रोहित पाटील निवडणूक लढवणार आहेत. शिराळ्यातून मानसिंगराव नाईक पुन्हा निवडणूक लढवतील. त्यामुळं या मतदारसंघात अजित पवार कुणाला उमेदवारी देतात यावर पुढील चित्र स्पष्ट होईल.
माजी खासदार संजयकाका पाटील यांची लेकासाठी मोर्चेबांधणी
तासगावात संजयकाका पाटील आणि सुमनताई पाटील, रोहित पाटील यांच्यामध्ये संघर्ष राहिलेला आहे. संजयकाका पाटील हे दोन टर्म भाजपचे खासदार राहिले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. तासगावमधून रोहित पाटील निवडणूक लढवणार आहेत. या ठिकाणी संजयकाका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील इच्छुक आहेत. जागा वाटपात हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्यास प्रभाकर पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी संजयकाका पाटील प्रयत्नशील आहेत. संजयकाका पाटील मुंबईत आज अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
अजित पवार यांना जागा सुटण्यामागचं कारण काय?
तासगाव कवठेमहांकाळ आणि इस्लामपूर या ठिकाणी गेल्या अनेक टर्ममध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचं चिन्ह घड्याळ असल्यानं इथं राष्ट्रवादीचा उमेदवार असल्यास फायदा होऊ शकतो, असा अंदाज महायुतीच्या नेत्यांचा आहे.
इतर बातम्या :