karnataka political Latest News : महाराष्ट्रात सध्या जशी राजकीय परिस्थिती आहे, तशीच स्थिती कर्नाटकमध्ये होणार असल्याचा दावा कर्नाटक माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी यांनी केला आहे. कर्नाटकमध्येही एक अजित पवार आहे, या वर्षाअखेरीस कर्नाटकमध्येही महाराष्ट्रसारखी राजकीय परिस्थिती असेल, असा दावा कुमारस्वामी यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना हाताशी धरत अजित पवार यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये (Maharashtra NCP Political Crisis ) सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवरांच्या या खेळीनंतर महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली. गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केला होता. त्यानंतर आता अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेत भाजपला पाठिंबा दर्शवला. या घटनेमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.
2019 मध्ये माझं सरकार कोसळेल, असे कुणाला वाटले होते. महाराष्ट्रातही असेच झाले, असे कुमारस्वामी म्हणाले. महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय हालचाली धक्कादायक आहेत. कर्नाटकमध्ये एखादा अजित पवार तयार होईल, अशी भीती आहे. कर्नाटकमध्ये असे घडायला जास्त वेळ लागणार नाही. वर्षभराच्या आतमध्ये काँग्रेस सरकार कोसळू शकते. कर्नाटकमध्ये अजित पवार कोण होणार? हे मी आता सांगणार नाही. पण हे लवकर होणार, असे कुमारस्वामी म्हणाले. कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्याशिवाय आणखी मुख्यमंत्री आहेत. काँग्रेसचे सरकार सुरुवातीलाच पटरीवरुन उतरले आहे, असेही कुमारस्वामी म्हणाले.
कुमारस्वामी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल -
यावेळी बोलताना कुमारस्वामी यांनी काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले की, काँग्रेसच्या वृत्तीमुळे देशबरात महागठबंधन होऊ शकत नाही. 2018 मध्ये आम्ही काँग्रेसपासून वेगळे का झालो ? दरम्यान, भाजपने विधानसभामध्ये गोंधळ घातला. काँग्रेसने डीके शिवकुमार यांच्यासोबत अन्याय केला, अशा घोषणा भाजपने सभागृहात दिल्या. कुमारस्वामी यांनी काँग्रेस सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. बदल्या करण्यासाठी पैसे घेतले जातात, असा दावा त्यांनी केला आहे. राज्य सरकारच्या काही विभागांमध्ये बदल्यासांठी पैसे घेतले जातात, याची एक टोळी सक्रीय आहे, असे कुमारस्वामी म्हणाले.
कर्नाटकमध्ये सरकार स्थापनावेळी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह -
भाजपचा पराभव करत काँग्रेसने कर्नाटकमध्ये एकहाती सत्ता मिळवली. पण सत्ता स्थापन करताना काँग्रेसमध्ये मोठा कलह झाला होता. मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धारमय्या यांच्याशिवाय डीके शिवकुमार यांच्या नावाची चर्चा सुरु होती. दोन्ही नेत्यांनी दिल्लीवारी करत मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता. अखेरीस काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी डीके शिवकुमार यांची समजूत काढली. सिद्धारमय्या यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदी म्हणून पदभार स्विकारला.