Diwali 2024 : महाराष्ट्रात दिवाळीची धामधूम ही पहिल्या अंघोळीपासून सुरू होते. पहिली अंघोळ म्हणजे अभ्यंगस्नान आणि हे अभ्यंगस्नान नरक चतुर्दशी दिवशी केलं जातं. दिवाळीतील महत्त्वाचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशीचा. या दिवशी नरकासूराचा वध करण्यात आला होता. त्यामुळे पहाटे सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून प्रतिकात्मक नरकासूराचा वध करून हा दिवस साजरा केला जातो. हीच दिवाळीतील पहिली आंघोळ म्हणून देखील ओळखली जाते. यंदा नरक चतुर्दशी नेमकी कधी? पहिली अंघोळ नेमकी कधी? जाणून घेऊया.


दिवाळीची पहिली अंघोळ कधी? (Narak Chaturdashi 2024)


यंदा 31 ऑक्टोबरला दिवाळीची पहिली अंघोळ असणार आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहिली अंघोळ असते, ज्याला अभ्यंगस्नान म्हणतात. यंदा पंचांगानुसार, नरक चतुर्दशी 30 ऑक्टोबरला दुपारी 1:15 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:52 वाजता संपेल. उदय तिथीनुसार, नरक चतुर्दशी किंवा दिवाळीची पहिली आंघोळ 31 ऑक्टोबर, म्हणजेच गुरुवारी असणार आहे. यादिवशी पहाटे उठून उटणं तेल लावून अभ्यंगस्नान केलं जातं. त्यानंतर नवीन कपडे घालून फराळाचं सेवन केलं जातं. 


अभ्यंगस्नानानंतर कारिटं का फोडतात?


नरकासुर नावाच्या एका असूर राजाची भगवान श्रीकृष्णाच्या काळात मोठी दहशत होती. तो इतरांना फार त्रास द्यायचा, स्त्रियांशी वाईट वागायचा, त्यामुळे जनता त्याला फार त्रासली होती. ही गोष्ट जेव्हा श्रीकृष्णाला कळली तेव्हा त्याने सत्यभामेसह त्या असूरी राजावर आक्रमण केलं आणि त्याचा वध केला. त्याच्या वधाचं प्रतिक म्हणून आपण हे कडू फळ फोडतो. आणि त्याचा रस जिभेला लावतो आणि 2 बिया डोक्याला लावतो. याबाबत असं सांगण्यात येतं की, ‘ते फळ फोडून आपण आजच्या काळातील प्रतिकात्मक नरकासूराचा वध करतो. शिवाय दुसरी वैज्ञानिक गोष्ट अशी सांगितली जाते की, अश्विन महिन्यात म्हणजेच दिवाळीच्या काळात हिवाळा सुरू झालेला असतो. फार थंडी असतो. त्यामुळे आपल्या शरीराचे तापमान योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी हे कडू फळ चाखलं जातं.'


धनत्रयोदशी ते भाऊबीजेपर्यंत 'या' आहेत तारखा 



  • धनत्रयोदशी - 29 ऑक्टोबर 2024 

  • नरक चतुर्दशी - 31 ऑक्टोबर 2024

  • लक्ष्मी पूजन - 01 नोव्हेंबर 2024 

  • बालिप्रतिपदा, दिवाळी पाडवा - 02 नोव्हेंबर 2024 

  • भाऊबीज - 03 नोव्हेंबर 2024


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Shani 2024 : दिवाळीपासून 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार; शनीची चाल करणार कमाल, नवीन नोकरीसह बँक बॅलन्सही वाढणार