Ajit Pawar Amit Shah Maharashtra Goverment: गृहखात्यावरून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात चढाओढ सुरू आहे तर तिकडे आपल्या पदरात महत्त्वाची खाती पडावी म्हणून अजित पवार (Ajit Pawar) गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून आहेत. मात्र अजूनही अजित पवार आणि अमित शाह यांची भेट झालेली नाही. अर्थमंत्री राष्ट्रवादीकडेच राहावं, मंत्रिमंडळात 7 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदासाठी अजित पवार आग्रही आहेत. तसेच केंद्रात एक कॅबिनेट आणि एका राज्यपाल पदाची देखील अजित पवारांची मागणी आहे. आता या पैकी किती मागण्या पूर्ण होतात आणि त्यासाठीच्या चर्चेकरीता अजित पवार आणि अमित शाहांची भेट आजतरी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


अखेर मुख्यमंत्री कोण होणार याचा फैसला आज होणार आहे. भाजप विधिमंडळ पक्षनेत्याची आज मुंबईत निवड होईल. आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची सकाळी 10 वाजता मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजप आमदार आपला विधिमंडळ पक्षनेत्याच्या नावावर मोहोर उमटवतील. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होईल अशीच चर्चा आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस विराजमान होतील हे जवळपास निश्चित आहे. 


महायुती आज सरकार स्थापनेचा दावा करणार-


भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड झाल्यानंतर, महायुती सरकार स्थापनेचा दावा करेल. दुपारी साडेतीन वाजता महायुतीचे नेते राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना भेटून, तिन्ही नेते सरकार स्थापनेचं पत्र राज्यपालांकडे सोपवणार आहेत. भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी मुंबईत दाखल झालेत. तर निर्मला सीतारामन देखील मुंबईत पोहचल्या आहेत. हे दोन्ही निरीक्षक शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची देखील भेट घेतील. महायुतीत एकी आहे हा संदेश पोहोचवण्यासाठी ही भेट असेल असं बोललं जात आहे.  


महायुतीचा उद्या मुंबईत शपथविधी-


मुंबईच्या आझाद मैदानात 5 नोव्हेंबरला होणाऱ्या महायुतीच्या शपतविधीसाठी मुंबई पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त राहणार आहे. शपथविधी सोहळ्या दरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता मुंबई पोलिसांकडून अडीच हजारहून अधिक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शपथविधी दरम्यान 10 पोलीस उपायुक्त, 20 सहाय्यक पोलीस आयुक्त, 100 पोलीस निरीक्षक, 150 सहाय्यक व पोलीस उपनिरीक्षकांसह 1500 हून अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर सशस्र पोलीस दल,  टास्क फोर्ससह इतर सुरक्षा यंत्रणाही सज्ज असणार आहेत. याशिवास आझाद मैदान परिसर हा नो फ्लाईंग झोन म्हणून घोषित करण्यात आला असून आजू बाजूच्या उंच इमारतींवरही पोलिस तैनात असणार आहेत.


संबंधित बातमी:


Eknath Shinde: हातात कागदपत्रे, चेहऱ्यावर निराशा...; दरेगावातून निघताच आजीबाई समोर आल्या, एकनाथ शिंदेंनी लगेच गाडी थांबवली अन्...