सांगली : जयंत पाटील यांना 35 वर्षात मतदारसंघाचा चौफेर विकास साधता आला असता. परंतु त्यांनी मिळालेल्या पदाचा आणि सत्तेचा वापर फक्त राजकारणात ओव्हरटेक करणाऱ्यांची जिरवा-जिरवी करण्यासाठी, त्यांना राजकारणातून कायमचे संपवण्यासाठी आणि दुसर्‍याच्या संस्था लुटण्यासाठी केला. आजपर्यंत ते फक्त गलिच्छ राजकारण करत आले अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. आष्टा येथे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. 


यावेळी अजित पवार यांनी जयंत पाटील यांची नक्कलवर नक्कल केली. नेतृत्व विकास करणारे लागतं. 'नुसतं काय सांगता, काय बोलता असं बोलून काही होत नाही. अरे काय सांगता... मी जे सांगतो तुमच्या डोक्यात घुसत नाही, मग काय सांगू' असे म्हणत अजित पवार यांनी जयंत पाटील यांची नक्कल करत टीका केली.


जयंत पाटलांच्या गावातील पोलिस स्टेशन आज देखील भाड्याच्या जागेत आहे. जयंत पाटलांना त्यांच्या गावातील पोलिस स्टेशन बांधता येत नाही आणि हे निघाले राज्याचे नेतृत्व करायला असे म्हणत अजित पवार यांनी जयंत पाटलांच्या संभाव्य मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर जोरदार टीका केली.


35 वर्षांत एकही एमआयडीसी उभारली नाही


महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही महायुती सरकारच्या माध्यमातून पुढे जात आहे असं सांगत अजित पवार म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीत आम्ही कमी पडलो. आता आमच्या चुका आम्ही सुधारल्या आहेत. शेतकरी हा माझ्या देशाचा कणा आहे. तो आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आम्ही पाऊले उचलली. येथील लोकप्रतिनिधीना 35 वर्षे तुम्ही निवडून दिले. पण त्यांना येथे एमआयडीसी उभारता आली नाही. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देता आला नाही." 


हे मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पाहतात


जयंत पाटलांवर टीका करताना अजित पवार म्हणाल्या की, "इस्लामपूर व आष्टा बसस्थानकाची काय अवस्था आहे ही मी सांगायची आवश्यकता नाही असं सांगत अजित पवार म्हणाले की, तुम्हाला तालुक्यातील महापुरुषांची स्मारके करता आली नाहीत. रिकव्हरी प्रमाणे दर द्यायचा झाला तर 3800 रुपये टनाला येथील शेतकर्‍याला मिळायला पाहिजे. दिवाळी सर्वांना सोबत घेऊन गोडधोड करायची असते. स्वतःच करून खायची नसते. तुम्हाला साधी मतदारसंघातील लोकांची दिवाळी साजरी करता येत नाही आणि तुम्ही मुख्यमंत्री पदाची स्वप्ने बघता. ऊस दर देण्यात स्पर्धा असावी. व्यक्तिगत स्वार्थ साधणारी स्पर्धा नसावी."


बारामतीपेक्षा चांगला विकास करतो


अजित पवार म्हणाले की, "तुम्ही जलसंपदा मंत्री होता. तुमच्या मतदारसंघातून नदी गेली आहे. तरीही तुम्हाला जनतेला पाणी देता आलं नाही, हे येथील लोकांचे दुर्देव आहे. मतदारसंघाचा विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी खमक्या असावा लागतो. निशिकांतदादांना या निवडणुकीत निवडून द्या. आम्ही पहिला  स्व.विलासराव शिंदे साहेबांचे स्वप्न असणारी भुयारी गटार योजना मार्गी लावून आरोग्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकू. एमआयडीसीची निर्मिती करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ. बारामतीपेक्षा चांगला विकास करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. इस्लामपूर मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलला नाही तर पवार नाव सांगणार नाही."


ही बातमी वाचा: