मुंबई: आमदारकीच्या राजीनाम्यानंतर अजित पवार राजकारणातून संन्यास घेतील अशी चर्चा सुरू झाली. खुद्द शरद पवार यांनीच कालच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी आपल्या मुलाशी झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली होती. ज्यात अजित पवार हे राजकारण सोडून शेती-उद्योग करण्याबाबत पार्थही बोलले होते. अजित पवार अन्य कुठल्याही पक्षात जाणं शक्य नसल्यानं शिवाय राष्ट्रवादीअंतर्गत रोहित पवारांचा उदय होत असल्यानं, अजित पवार राजकारण सोडतील का? हाच प्रश्न राजकीय जाणकारांच्या मनातही होता. मात्र, अजित पवारांनी या शक्यता फेटाळून लावल्या.


आज यशवंतराव चव्हाण केंद्रात झालेल्या पत्रकार परिषदेनंतर 'एबीपी माझा'शी ते बोलत होते. यावेळी पवार म्हणाले की, मी शस्त्र खाली टाकलेलं नाही. मात्र, आम्ही सगळे (पवार कुटुंबिय या अर्थानं) गेली ६० वर्ष हे राजकारण पाहतोय. म्हणून मुलाला सल्ला दिला की तू आपला धंदापाणी पाहा.

बारामतीतून निवडणूक लढवणार का, या प्रश्नावर अजित पवार आधी म्हणाले की पवार साहेब देतील तो निर्णय मान्य असेल. मात्र, नंतर साहेब म्हणाले की तुला बारामती लढवावी लागेल. यानंतर त्यांनी शेजारीच असलेल्या पक्षाध्यक्ष जयंत पाटलांकडे पुढचे प्रश्न टोलावले. याच प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले की, अजित पवार बारामतीत प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांनी नाही लढवायचं म्हटलं तरी लोक त्यांना घराबाहेर काढून निवडणुकीला उभं करतील.

शिखर बँक घोटाळाप्रकरणीही पत्रकारांनी विचारलं असता, "चौकश्या झाल्या पाहिजेत. जे असेल ते बाहेर यायला पाहिजे. आता सारखं तेच विचारणार असाल तर आख्ख्या फॅमिलीचं अफिडेव्हिट देऊ का"? असा टोलाही अजित पवारांनी लगावला.