मुंबई: विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना शरद पवार यांनी आता आपले पत्ते एक-एक करुन उघड करायला सुरुवात केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सत्ताधारी गटातील बड्या नेत्यांना गळाला लावल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) अजूनही स्वस्थ बसलेले नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर अजितदादा गटाला शह देण्यासाठी शरद पवार राजकीय डाव टाकताना दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणून अजित पवार यांचे निष्ठावंत सतीश चव्हाण (Satish Chavan) यांना शरद पवार गटाकडून गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
सतीश चव्हाण यांनी शुक्रवारी सिल्वर ओक निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली. सतीश चव्हाण यांनी नुकतेच महायुतीवर खरमरीत टीका करणारे पत्र लिहले होते. सतीश चव्हाण हे गंगापूर विधानसभेसाठी इच्छूक आहेत. त्यामुळे सतीश चव्हाण यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे समजते. ते लवकरच तुतारी हाती घेऊन शरद पवार गटात प्रवेश करु शकतात.
अदिती तटकरेंची कोंडी करण्यासाठी शरद पवारांचा डाव
शरद पवार गटाकडून अजित पवार गटातील प्रमुख नेत्यांची कोंडी करण्यासाठी डाव टाकले जात आहेत. यामध्ये कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे यांच्यासमोर शरद पवार गटाकडून राजकीय आव्हान निर्माण केले जाणार आहे. ज्ञानदेव पवार हे आज मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
ज्ञानदेव पवार हे माणगावचे माजी नगराध्यक्ष पवार आहेत. ते सध्या शिंदे गटात आहेत. त्यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाने रायगडमध्ये अदिती तटकरे यांच्याविरोधातील मविआची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ज्ञानदेव पवार यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
ज्ञानेश्वर पवार यांनी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते जितेंद्र आव्हाड यांची भेट घेऊन याबाबतीत सविस्तर चर्चा सुद्धा केली आहे. अदिती तटकरे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक उमेदवार असल्याचे म्हटलं जातंय. त्यामुळे ओबीसी समाजाचा नवा चेहरा ज्ञानदेव पवार यांच्याकडे बघितले जाते. या मतदार संघात 60 टक्के ओबीसी समाज असल्यानं त्याचा फायदा पवार यांना होऊ शकते. श्रीवर्धन मतदार संघात ओबीसी समाजाला अद्याप नेतृत्व न मिळाल्याने पवार यांची ताकद मजबूत करण्यासाठी ओबीसी समाजाने देखील त्यांना पाठबळ देण्याचं ठरवले आहे.
अजितदादा गटाकडून नवाब मलिक आणि त्यांची कन्या सना मलिक दोघेही विधानसभेच्या रिंगणात
अजित पवार गटातील नवाब मलिक आणि त्यांची कन्या सना मलिक दोघेही विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. नवाब मलिक शिवाजीनगर-मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. तर सना मलिक अणुशक्ती नगरमधून रिंगणात उतरणार आहेत. अजित पवार यांच्या घड्याळाच्या चिन्हावर नवाब मलिक आणि त्यांची कन्या निवडणूक लढणार आहेत. 28 तारखेला नवाब मलिक उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता तर सना मलिक 23 तारखेला अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा