औरंगाबाद : निवडणूक ग्रामपंचायत सदस्यांची असू दे किंवा खासदारकीची, उमेदवारी अर्ज भरताना उमेदवार शुभ-अशुभ दिवस पाहतोच. लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवारही अर्ज भरताना ग्रह-तारे आणि शुभ-अशुभ दिवस कोणता, हे जाणून घेण्यासाठी ज्योतिषांचे उंबरठे झिजवत आहेत.
औरंगाबादमधले मुळे गुरुजी सध्या चांगलेच व्यस्त आहेत. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून निवडणूक अर्ज भरण्यासाठी कोणत्या राशीला कोणता दिवस आणि कुठली वेळ शुभ आहे, याचं गणित जुळवण्यात त्यांचा वेळ जात आहे.
महाराष्ट्रात यावेळी चार टप्प्यात निवडणुका होत आहेत. प्रत्येक टप्प्यात अर्ज भरण्यासाठी सात दिवस देण्यात आले आहेत. आता हे सात दिवस ठरवताना निवडणूक आयोगागाने पंचांगाचा अभ्यास केला नसला, तरी या सात दिवसात कुठला दिवस शुभ आहे हे नेत्यांना जाणून घ्यायचं आहे.
हे शुभ दिवसापुरतं मर्यादित नाही, तर शुभ दिवसातील कुठल्या वेळी अर्ज भरावा, कुठल्या वेळेत तो निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर करावा, अर्ज देताना पूर्वेकडे उभं राहावं की पश्चिमेकडे, इतक्या छोट्या प्रश्नांचा भडिमार ज्योतिषांवर होत आहे.
2019 ची निवडणूक सिंह, वृषभ, कर्क, मीन आणि कुंभ या राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायी राहील असा जोतिषांचा अंदाज आहे. ज्योतिषांच्या मते या चार राशींना निवडणूक अर्ज भरताना कुठले दिवस शुभ आणि कुठले अशुभ आहेत, यावर एक नजर
टप्पा पहिला
18 मार्च ते 25 मार्च या सात दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत.
ज्योतिषांच्या मते-
18 उत्तम दिवस, 19 चांगला दिवस, 20 वर्ज्य दिवस, 21 क्षय दिवस, 22 शुभ दिवस, 23 तारखेला 12 वाजेपर्यंत चांगला दिवस, 24 अनिष्ट दिवस, 25 शुभ दिवस.
18, 19, 22, 23 आणि 25 मार्च याच दिवशी अर्ज भरण्याचा ज्योतिषांचा सल्ला
टप्पा दुसरा
19 मार्च ते 26 मार्चच्या दरम्यान निवडणूक अर्ज दाखल करायचा आहे
ज्योतिषांच्या मते-
19, 22, 23 आणि 25 हे शुभ दिवस आहेत, तर 20, 24 आणि 26 अनिष्ट असल्याचं ज्योतिषांचं मत
टप्पा तिसरा
28 मार्च ते 4 एप्रिल या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे
ज्योतिषांच्या मते-
28, 29 30 तारखेला 2 वाजेपर्यंत शुभ दिवस, 31 शुभ, 1 सामान्य, 2 तारखेला सकाळी 9 वाजता शुभ, 3 आणि 4 अशुभ दिवस आहेत. 4 तारखेला अमावस्या आहे
टप्पा शेवटचा (चौथा)
2 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे
ज्योतिषांच्या मते-
2 तारखेला सकाळी 9 वाजता शुभ, 3 आणि 4 अशुभ (वर्ज्य) दिवस आहेत. 4 आणि 5 तारखेला अमावस्या असल्याने अशुभ. 6, 7 शुभ दिवस, 8 तारखेला सकाळी 10 पर्यंत चांगला दिवस, 9 तारखेला 4 वाजेपर्यंच चांगला मुहूर्त
नेते केवळ निवडणुकीतील आपलंच भविष्य पाहत नाहीत, तर विरोधात उभ्या असलेल्या नेत्याचंही राहूबल गुरुबल विचारतात. निवडून येण्यासाठी कुठली पूजा, गोसेवा दानधर्म करावा, कुठला यज्ञ करावा, याचीही माहिती घेतली जाते. ज्योतिषींच्या मते सध्याचं ग्रहमान शिवसेना-भाजपच्या बाजूने आहे.
कोणी याला थोतांड मानतं, तर कोणाची यावर श्रद्धा आहे. याला श्रद्धा म्हणायचं, अंधश्रद्धा म्हणायचं, की थोतांड हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न, मात्र सध्या ज्योतिषांच्या घराकडे वळलेली नेत्यांची पाऊल मात्र 'राजकीय श्रद्धा' अधोरेखित करतात, हे नक्की
उमेदवारी अर्ज भरण्याची शुभ वेळ काय? इच्छुकांची पावलं ज्योतिषांकडे
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
19 Mar 2019 04:41 PM (IST)
शुभ दिवसातील कुठल्या वेळी अर्ज भरावा, कुठल्या वेळेत तो निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर करावा, अर्ज देताना पूर्वेकडे उभं राहावं की पश्चिमेकडे, इतक्या छोट्या प्रश्नांचा भडिमार ज्योतिषांवर होत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -