पुणे : कोरेगाव-भीमामध्ये एक जानेवारीला विजयस्तंभाच्या परिसरात सभा घेण्यासाठी पुणे पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे. विजयस्तंभ परिसरातील पाच मैदानांवर वेगवेगळ्या संघटनांच्या सभा होणार आहेत.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवली जाऊ नये, यासाठी पोलिसांचं सायबर सेल कार्यरत आहे. तसेच 11 ड्रोन कॅमेरांनी या ठिकाणी नजर ठेवली जाणार आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 1 जानेवारी 2018 रोजी उसळलेल्या हिंसाचारात ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यांना यावेळी जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनाही ही बंदी लागू आहे का, या प्रश्नाला सरळ उत्तर देणं पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी टाळलं.

कोरेगाव भीमामध्ये विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी एक जानेवारीला मोठ्या संख्येने लोक येणार असल्याने नियोजनासाठी आज सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आणि गिरीश बापट यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह विविध पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

30 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत मोठ्या संख्येने नागरिक विजयस्तंभाला भेट देतात. गेल्यावर्षी याच ठिकाणी उसळलेल्या हिंसाचाराचे पडसाद मुंबईसह राज्यभरात उसळले होते. त्यामुळे तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याची काळजी घ्यावी लागणार आहे.