मुंबई : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांमधील मतदारांची मतं ईव्हीएममध्ये बंद झाली आहेत. एबीपी न्यूज-लोकनीती-सीएसडीएस यांच्या एक्झिट पोलमध्ये मतदारांचा कल पाहायला मिळत आहे. एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 15 वर्षांचा वनवास संपवून काँग्रेस मध्य प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवली जात आहे. सत्ताधारी भाजप बहुमतापासून बराच दूर राहण्याची चिन्हं सर्वेक्षणात दिसत आहेत.

मध्य प्रदेश विधानसभेत 230 जागा असून बहुमताचा आकडा 116 आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल मंगळवार 11 डिसेंबरला जाहीर होतील, मात्र एबीपी न्यूज-लोकनीती-सीएसडीएस यांच्या एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशात काँग्रेस 122 ते 130 जागा मिळवण्याचा अनुमान आहे. भाजपच्या पारड्यात केवळ 91 ते 97 मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजेच काँग्रेसला सरासरी 126, तर भाजपला 94 जागा मिळण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. 10 जागा इतरांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे.


2013 च्या तुलनेत भाजपची पिछेहाट

एबीपी न्यूज-लोकनीती-सीएसडीएस यांच्या एक्झिट पोलची तुलना 2013 च्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाशी केली, तर भाजपची मोठी पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळत आहे. 2013 मध्ये भाजपने 165 जागा मिळवत एकहाती विजय मिळवला होता. एक्झिट पोलशी तुलना केली, तर यावेळी भाजपला 71 जागांचा तोटा होण्याची शक्यता आहे.

2013 मध्ये काँग्रेसने केवळ 58 जागा मिळवल्या होत्या, मात्र यावेळी एक्झिट पोलनुसार काँग्रेस 126 जागा खिशात घालण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पंधरा वर्षांनंतर एमपीमध्ये काँग्रेस पुन्हा सत्ता काबीज करेल, अशी शक्यता एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. गेल्या निवडणुकांत सात जागांवर इतर उमेदवारी विजयी झाले होते, यावेळी हा आकडा वाढून दहावर जाण्याची शक्यता आहे.

एक्झिट पोलमधील निरीक्षणं

काँग्रेसला 43 टक्के मतं मिळण्याची शक्यता

भाजपच्या पारड्यात 40 टक्के मतं पडण्याची चिन्हं

शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्रिपदासाठी फेवरेट

वैयक्तिकरित्या ज्योतिरादित्य सिंधिया शिवराज यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय

मोदी सरकारबाबत जनतेच्या मनात समाधान कमी

संबंधित बातम्या :

Assembly Election Exit Polls: भाजपच्या हातून दोन राज्यं निसटण्याचा अंदाज

Chhattisgarh Exit Poll: रमण सिंह चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदी बसण्याची चिन्हं

Rajasthan Exit Poll : वसुंधरा राजेंना धक्का, भाजपचे तीनतेरा