मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री झरीन खानने तिच्या माजी मॅनेजरविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अंजलीने अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप झरीनने केला आहे. खार पोलिसांनी अंजलीविरोधात कलम 509 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
अंजली ही झरीन खानकडे तीन-चार वर्षांपासून मॅनेजर म्हणून काम करत होती. त्यावेळी झरीनकडेच काम नसल्यामुळे तिला पैशांची चणचण भासू लागली. त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सांगून झरीनने तिला काम सोडण्यास सांगितलं होतं.
त्यानंतरही काही महिने अंजली झरीनसोबत काम करत राहिली. मात्र झरीनने पगार न दिल्याने दोघींमधील वाद वाढला. त्यानंतर अंजली कधी फोन करुन, तर कधी मेसेज करुन धमकी देऊ लागली आणि अश्लील शिवीगाळ करु लागली, असा आरोप झरीनने केला आहे. खार पोलीस या सर्व घटनेचा अधिक तपास करत असून गरज पडल्यास अंजलीचंही स्टेटमेंट घेतलं जाणार आहे.
झरीनने सलमान खानसोबत 'वीर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर रेडी, हाऊसफुल 2, हेट स्टोरी 3 यासारख्या चित्रपटातून काम केलं.