Gujarat Election Opinion Poll 2022 : गुजरात (Gujarat) विधानसभेच्या निवडणुका (Gujarat Assembly Election) यावर्षी डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. गेल्या 27 वर्षांपासून गुजरात राज्यात भाजपचं सरकार आहे. माजी मुख्यमंत्री विजय रुपानी (Vijay Rupani) यांच्या राजीनाम्यानंतर भूपेंद्र पटेल (Bhupendrabhai Patel) सप्टेंबर 2021 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते.


सी-व्होटरनं एबीपी न्यूजसाठी (ABP News) एक ओपिनियन पोल घेतला आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel)  यांनी आपल्या एक वर्षाच्या कार्यकाळात राज्यातील जनतेवर छाप सोडली आहे की, नाही? हे जाणून घेण्यासाठी ओपिनियन पोल (Opinion Poll) घेण्यात आला आहे. या सर्वेमधून धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत.


मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांच्याबद्दल जनतेचं मत काय? 


गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचं काम कसं आहे? ओपिनियन पोलमध्ये सी-व्होटरच्या या प्रश्नावर लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. सर्वाधिक 36 टक्के लोकांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचं काम चांगलं असल्याचं सांगितलं आहे. 29 टक्के लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचं वर्णन केलं आहे. तर 35 टक्के लोकांनी मुख्यमंत्र्यांचं काम सरासरी असल्याचं सांगितलं आहे.


मुख्यमंत्र्यांच्या कामावर जनता खूश? 



  • अवघ्या एक वर्षांच्या कार्यकाळात गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले. भूपेंद्र पटेल यांनी स्टुडंट स्टार्टअप आणि इनोव्हेशन पॉलिसी, आयटी पॉलिसी, बायोटेक्नॉलॉजी पॉलिसी आणि स्पोर्ट्स पॉलिसी यासह अनेक धोरणं लागू केली आहेत. या दरम्यान त्यांनी 11 नवीन विद्यापीठांना मान्यता दिली.

  • सीएम पटेल यांनी सिंचन आणि नर्मदा कालवा प्रकल्प पुढे नेत सिंचनाशी संबंधित सुविधांसाठी 4370 कोटी रुपयांच्या योजना मंजूर केल्या आहेत. 

  • नैसर्गिक शेतीला चालना देण्याबाबत ते बोलत आहेत. गुजरातमधील डांग जिल्ह्याला 100 टक्के नैसर्गिक शेती करणारा जिल्हा करण्यात यश आलं आहे. 

  • गुजरात राज्यात दर शुक्रवार हा वैद्यकीय दिन म्हणून साजरा करून सीएम पटेल हे वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वाचं कार्य करत आहेत. वैद्यकीय दिवसांत, संसर्गजन्य आणि इतर रोगांची तपासणी आणि उपचार केले जातात.

  • ग्रामीण भागातील लोक ई-ग्राम विश्वग्राम योजनेशी जोडले गेले आहेत.

  • आदिवासी भागांत 500 नवीन मोबाईल टॉवर बसविण्यात आले आहेत.

  • सुमारे 1.25 लाख अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना सुमारे 200 कोटी रुपयांचं मॅट्रिकोत्तर स्टायपेंड देण्यात आलं आहे.

  • गुजरातमध्ये पहिल्यांदाच दोन लाख 44 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. ज्यामध्ये गायींना चारा उपलब्ध व्हावा यासाठी गौमाता पोषण योजनेसाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.

  • सध्याचं सरकार राज्यातील गरोदर महिलांना पौष्टिक आहार देण्याची योजना राबवत आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात 850 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.


गुजरात व्यतिरिक्त हिमाचल प्रदेशातही यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. एबीपी न्यूजसाठी, सी-व्होटरनं दोन्ही राज्यांतील सर्व विधानसभा जागांसंदर्भात सर्वे करण्यात आला आहे. ओपिनियन पोलमध्ये दोन्ही राज्यातील 65 हजार 621 लोकांकडून मत जाणून घेण्यात आलं. 


सर्वेक्षणातून समोर आलेले निकष पूर्णपणे लोकांकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित आहेत, त्यामुळे यातचून एबीपी न्यूज अथवा एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.