मुंबई : आजपर्यंत शिवसेना आणि शिवसैनिकांनी सामान्य लोकांसाठी राजकारण आणि समाजकारण केलं. याच समाजकारणासाठी मी निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली. यावेळी त्यांनी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे देखील सांगितलं. वरळीमध्ये आयोजित शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.
माझ्या विरोधात कुणीही लढू द्या. त्यांना अधिकार आहे. मात्र मला भीती नाही. माझ्यासाठी ही खूप ऐतिहासिक गोष्ट आहे. ही मी घेतलेली मोठी उडी आहे. मात्र मला चिंता नाही कारण आपण मला पडू देणार नाहीत, असे यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले. नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी राजकारणात आलो असल्याचं यावेळी अदित्य ठाकरे म्हणाले.
हा निर्णय माझ्या स्वत:साठी नाही. मला जनतेसाठी आणि लोकांच्या न्याय हक्कासाठी निवडणूक लढवायची आहे. हीच ती वेळ आहे नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. मला प्रदूषण मुक्त महाराष्ट्र, सुंदर स्वच्छ महाराष्ट्र घडवायचा आहे. मी माझ्यासाठी नाही तर जनतेसाठी निवडणूक लढवणार आहे. मला मुख्यमंत्री बनायचं आहे म्हणून नाही तर लोकांच्या न्याय हक्कांसाठी निवडणूक लढायची आहे.
गेली दहा वर्ष मी महाराष्ट्र पिंजून काढत आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी मला काम करायचं आहे, असेही ठाकरे म्हणाले. जनआशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने मला महाराष्ट्रभरातून खूप प्रेम मिळाले. जनआशिर्वाद यात्रेदरम्यान मी निवडणूक लढवावी की नाही, याबाबत मतं जाणून घेतली. यावेळी मला अनेकांनी निवडणूक लढवण्याचा आग्रह केला असेही ते म्हणाले. मला लहानपणापासूनच राजकारणाची आवड आहे. आजोबा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, वडील उद्धव ठाकरे यांच्यासोबत लहानपणापासून समाजकारण आणि राजकारण जवळून पाहिले आहे, असेही आदित्य यावेळी म्हणाले.
आदित्य यांच्या रुपात ठाकरे घराण्यातला पहिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. यावेळी व्यासपीठावर आदित्य यांची आई रश्मी ठाकरे, लहान बंधू तेजस ठाकरे देखील हजर होते. मात्र तिकीटवाटपाच्या कामात व्यस्त असल्यानं उद्धव ठाकरेंना कार्यक्रमाला हजर राहता आलं नाही.
मी निवडणूक लढवणार, आदित्य ठाकरेंची घोषणा, वरळीतून विधानसभेच्या मैदानात उतरणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Sep 2019 05:56 PM (IST)
माझ्या विरोधात कुणीही लढू द्या. त्यांना अधिकार आहे. मात्र मला भीती नाही. माझ्यासाठी ही खूप ऐतिहासिक गोष्ट आहे. ही मी घेतलेली मोठी उडी आहे. मात्र मला चिंता नाही कारण आपण मला पडू देणार नाहीत, असे यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -