मुंबई : राज्यातील सर्वच जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकं नेमण्यात आली असून मुंबई, (Mumbai) पुण्यासह ग्रामीण महाराष्ट्रातही पोलिसांकडून नाकाबंदी व वाहनांची तपासणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील खेड शिवारात कोट्यवधींची रोकड पोलिसांकडून हस्तगत करण्यात आली होती. तर, जळगावमध्येही पोलिसांनी रोकड जप्त केली होती. त्यानंतर, आता भिवंडी शहरातील एका वाहनातून मोठी रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. दरम्यान,15 ते 30 ऑक्टोबर 2024 पर्यंत एकूण 187 कोटी 88 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
शहापूर व भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात स्टॅटिक सर्विलन्स टीम व पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे. मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाटातील चिंतामण वाडी पोलीस चौकीजवळ स्थानिक पोलीसांनी वाहनातून रक्कम पकडली आहे. या वाहनातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून पैसे मोजण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे भिवंडी पश्चिम विधानसभा क्षेत्रातील तळवली नाका परिसरात देखील एका कारमध्ये रोख रक्कम पकडण्यात आली असून पंचनामा करून 3 लाख 75 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे, सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकं सक्रीयपणे तैनात झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने निवडणुकांची घोषणा केल्यानंतर आणि आचारसंहिता लागल्यानंतर पुण्यात दोन ठिकाणी मोठं घबाड सापडलं होतं. पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरिल खेड शिवापूर टोलनाक्यावर एका कारमध्ये तब्बल पाच कोटी रुपयांच्या नोटा सापडल्या होत्या.
187 कोटींची रक्कम जप्त
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत 15 ते 30 ऑक्टोबर 2024 पर्यंत एकूण 187 कोटी 88 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. निवडणूक आचारसंहितेच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या राज्यातील विविध अंमलबजावणी यंत्रणांनी ही कामगिरी केली आहे. विविध ठिकाणी पोलीस विभाग आणि इतर यंत्रणांनी उभारलेले तपासणी नाके योग्य पध्दतीने कार्यरत असल्यामुळे हे यश मिळाले आहे. यामध्ये प्रामुख्याने राज्य पोलीस विभागाने सुमारे 75 कोटी रूपये, इन्कमटॅक्स विभागाने सुमारे 60 कोटी रूपये, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुमारे 11 कोटी रूपये यांचा प्रामुख्याने समावेश आहे. दरम्यान, मतदारांना आचारसंहिता भंगाचा प्रकार आढळल्यास आयोगाच्या ‘सी-व्हिजील’ ॲपवर तक्रार करता येते. या तक्रारींची माहिती सर्व अंमलबजावणी यंत्रणांना दिली जात असल्याने आवश्यक ठिकाणी जप्तीची कारवाई केली जात आहे.
भुलेश्वरमधून 1 कोटी 32 लाखांची रोकड जप्त
मुंबईच्या भुलेश्वरमधून 1 कोटी 32 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. ही रक्कम नेमकी कोणाची आहे. याबाबतचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. यापूर्वी पुण्यात रोकड नेण्यासाठी आरोपींकडून कारचा वापर करण्यात येत होता. आता मात्र, पाच लोक संशयितरित्या बॅग घेऊन जात होते.
हेही वाचा
Video: फडणवीस म्हणाले, मनोज जरांगेंना दिवसांतून तीनवेळा मीच का दिसतो; आता, पाटलांनीही केला पलटवार