नागपूर : नागपुरातून निवडणुकीचे काम आटपून उमरेडकडे परत जाणाऱ्या शिक्षकांच्या वाहनाला अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत दोन शिक्षक गंभीर जखमी आहेत. नागपूर उमरेड रस्त्यावर चांपा गावाजवळ आज पहाटे 4 वाजता ही घटना घडली.


नुकेश मेंधुले (38) आणि पुंडलिक बहे (56) अशी मृत शिक्षकांची नावं आहेत. तर विजय बोहरूपी, रमेश पिपरे अशी जखमी शिक्षकांची नावं आहेत. या सर्व शिक्षकांची निवडणूक मतदान कर्मचारी म्हणून हिंगणा विधानसभा क्षेत्रात नियुक्ती करण्यात आली होती.

निवडणुकीचे कामकाज आटोपून चारही शिक्षक पहाटेच्या सुमारास चारचाकी वाहनाने उमरेडला निघाले होते. रमेश पिपरे हे वाहन चालवत असताना वाहनाने एका झाडाला जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की वाहनाचा पुढील भागाचा पूर्णतः चेंदामेंदा झाला.

यामध्ये नुकेश मेंढुले हे जागीच ठार झाले तर पुंडलीक बहे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दोन शिक्षक जखमी झाले आहेत.  दोन जखमी शिक्षकांना उपचारासाठी नागपूर मेडिकल येथे रवाना करण्यात आले आहे. नुकेश उमरेड येथील अशोक विद्यालयात कार्यरत होते तर पुंडलिक बहे हे कुही तालुक्यातील साळवा येथील खापर्डे विद्यालयात मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते.

दुसरीकडे यवतमाळमध्येही निवडणुकीचे काम आटोपून येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात आर्णी तालुक्यातील कोसदनी घाटात अपघात अल्टो आणि बोलेरोच्या अपघातात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. जखमींवर आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री 1 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
निवडणूक संदर्भातील काम आटोपून हे चार कर्मचारी त्यांच्या कारने पुसद तालुक्यातील कोंदरी या मतदान केंद्रावरून आर्णीकडे येताना कोसदनी घाटात समोरुन येणाऱ्या बोलेरोने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. यात कारमधील विकास गुट्टे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य  3 कर्मचारी जखमी झाले आहेत. हे सर्व कृषी विभागातील कर्मचारी आहेत. मृत विकास गुट्टे हे घाटंजी येथे कृषी सहायक होते. जखमींना आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. .

VIDEO | मतदानाचं काम आटोपून परतताना एका अपघातात शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू | यवतमाळ | एबीपी माझा